PM Modi Maldives Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात २४ जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेत भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे जवळपास ३४ अब्ज डॉलर्सने व्यापार वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, ब्रिटननंतर आता पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी मालदीवमध्ये पोहोचले आहेत. यावेळी भारत आणि मालदीवमधील राजनैतिक संबंधांचं त्यांनी कौतुक केलं आहे. तसेच मालदीवला तब्बल ५६५ दशलक्ष डॉलर्स कर्ज देण्याची घोषणा देखील पंतप्रधान मोदींनी केली आहे. यावेळी मोदींनी मालदीव भारताचा फक्त शेजारी नाही तर सहप्रवासी असल्याचं म्हटलं आहे. तसेच मालदीव हा भारताचा सर्वात विश्वासू मित्र असून भारतही प्रत्येक संकटात ‘फर्स्‍ट रेस्‍पोंडर’ म्हणून उभा राहिल्याचंही मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“भारताला मालदीवचा सर्वात विश्वासू मित्र असल्याचा अभिमान आहे. आपत्ती असो किंवा कोवीडची साथ असो, भारत नेहमीच फर्स्‍ट रेस्‍पोंडर म्हणून पाठीशी उभा राहिला आहे. मग जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा विषय असो किंवा कोविडनंतर अर्थव्यवस्था हाताळण्याचा, भारताने नेहमीच एकत्र काम केलं आहे. भारतासाठी मैत्री नेहमीच प्रथम असते. भारत मालदीवच्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी नेहमीच पाठिंबा देईल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य हे परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

मालदीवला ५६५ दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्याच्या दरम्यान मालदीवसाठी तब्बल ५६५ दशलक्ष डॉलर्स लाइन ऑफ क्रेडिट देण्याची घोषणा केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि मालदीवमध्ये मुक्त व्यापार करारावरही चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले की, “विकासाच्या भागीदारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मालदीवसाठी ५६५ दशलक्ष डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. मालदीवच्या लोकांच्या प्राधान्यांनुसार येथील पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांसाठी ही मदत वापरली जाईल”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींचं मालदीवमध्ये भव्य स्वागत

पंतप्रधान मोदी यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच व्यापार, संरक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला. दरम्यान, आज (२५ जुलै) सकाळी पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे देखील उपस्थित होते.