Man Arrested for seeking INS Vikrant Location : आयएनएस विक्रांत या युद्धनौकेबद्दल माहिती मिळवण्यासाठी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) चा अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या एका केरळच्या कोझिकोडमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुजीब रहमान असे असून तो एलाथूरचा रहिवासी आहे.

दरम्यान भारतीय नौदलाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर या व्यक्तीवर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने आयएनएस विक्रांतची माहिती का मिळवण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्याची चौकशी केली जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेलेले असताना हा प्रकार समोर आला आहे. ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतावदी तळांवर हल्ला केला होता.

या यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या मोहिमेनंतर, पाकिस्तानने भारताविरोधात १५ ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रोन आणि क्षेपणास्त्राने नियंत्रन रेषेवर हा हल्ला करण्यात आला. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने हे हल्ले तात्काळ प्रभावीपणे परतवून लावले.

तर १० मे रोजी पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर शस्त्रविरामावर सहमती झाली. पण यानंतर काही तासांमध्ये पाकिस्तानकडून या शस्त्रविरामाचे उल्लंघन करण्यात आले होते. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकडून पत्रकार परिषद घेत ऑपरेसन सिंदूर बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

दरम्यान, आरोपी मुजीब रहमान याने पीएमओ, राघवन येथील अधिकारी असल्याचे भासवून आयएनएस विक्रांतच्या ठिकाणाबद्दल माहिती मागितली, असे वृत्त आहे. कोची येथील नौदल कमांड मुख्यालयात यासंबंधीचा फोन करण्यात आला होता.

आयनएस विक्रांत

आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे जी पूर्णपणे देशात तयार करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये ही युद्धनौका कोची शिपयार्ड येथे बांधण्यात आली. ही युद्धनौका ४० लढाऊ विमाने ऑपरेट करू शकते, ज्यामध्ये मिग-२९के लढाऊ विमानांचे दोन स्क्वॉड्रन आणि सुमारे १० कामोव का-३१ हेलिकॉप्टरचा समावेश आहे. तसेच ही युद्धनौका ६४ बराक क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.