बॉलिवूड चित्रपट ‘धूम २’ मधील हृतिक रोशनच्या भूमिकेपासून प्रेरणा घेत एका व्यक्तीने भोपाळमधील वस्तू संग्रहालयातून चक्क १५ कोटी रुपायांचे सोने चोरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्न करताना तो बेशुद्ध झाल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विनोद यादव असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

एनटीडीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, विनोद यादव याने रविवारी संध्याकाळी तिकीट घेऊन वस्तू संग्राहलयात प्रवेश केला होता. तसेच संग्रहालय बंद होईपर्यंत तिथेच लपून बसला. सोमवारी वस्तू संग्रहालय बंद असल्याने त्याने अनेक यादव कालीन नाण्यांसह अनेक मौल्यावान वस्तू आपल्या बॅगेत टाकल्या. त्यानंतर खिडकीची काच फोडून उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याला दुखापत झाली आणि तो बेशुद्ध झाला.

हेही वाचा – Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका

दरम्यान, मंगळवारी येथील कर्मचाऱ्यांना वस्तू संग्रहालय उघडल्यानंतर त्यांना खिडकीची काच फुटलेली दिसली. तसेच वस्तू संग्रहालयातील अनेक मौल्यावान वस्तू गायब असल्याचेही त्यांच्या लक्षात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी संग्रहालय परिसरात पाहणी केली असता, त्यांना विनोद यादव बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तसेच त्यांच्या बॅगेत अनेक संग्रहालयातील मौल्यावान वस्तूही सापडल्या.

कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, आरोपीने भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असावा, ज्यामुळे त्याला दुखापत झाली आणि तो बेशुद्ध झाला असावा, असं प्रथमदर्शनी निर्देशनास आलं आहे. आम्ही याप्रकरणाची चौकशी करत आहोत, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त रियाझ इक्बाल यांनी दिली. तसेच संग्रहालयातून ५० हून अधिक बोटांचे ठसे गोळा करण्यात आले असून यात आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Supreme Court : “आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे कायद्याविरोधात”, सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सरकारवर ताशेरे

महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर आता वस्तू संग्रहालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वस्तू संग्रहालयात अलार्म सिस्टम नसल्याचेही पुढे आले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बंद आहेत. याव्यतिरिक्त, या संग्रहालयाचे दरवाजे, कमकुवत असून छताचा काही भाग सहजपणे तुटता येण्याजोग्या प्लास्टिकच्या शीटने झाकलेला आहे.