बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर गुरुवारी एका समारंभात बूट भिरकावणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली. नितीशकुमार यांच्या मूळ गावी म्हणजे बख्तियारपूरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर इसमाचे नाव पी. के. राय असे असून त्याला अटक करण्यात आल्याचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले.
राय याने भिरकावलेला बूट व्यासपीठाजवळच पडला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तो समस्तीपूरचा रहिवासी असून आपल्या तक्रारीचे निवारण न झाल्याने त्याने सदर कृत्य केले, असे प्राथमिक चौकशीत आढळले, असे पोलिसांनी सांगितले.
लालूप्रसाद यांच्याविरुद्धचा आणखी एक खटला मागे
राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्धचा एक खटला मागे घेतल्याबद्दल भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या प्रकारामुळे त्यांनी निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेला मूर्ख बनविले आहे, असे भाजपने म्हटले आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशावरून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा लालूप्रसाद यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेऊन राज्य सरकारने आयोगाला मूर्ख बनविले आहे, असे भाजपचे नेते नंदकिशोर यादव यांनी म्हटले आहे.लालूप्रसाद यांच्याविरुद्धचा खटला रद्द करून नितीशकुमार यांनी ते लालूप्रसाद यांच्या दबावाखाली असल्याचे सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2016 रोजी प्रकाशित
नितीशकुमार यांच्यावर बूट भिरकावणाऱ्याला अटक
राय याने भिरकावलेला बूट व्यासपीठाजवळच पडला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

First published on: 29-01-2016 at 02:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man hurls shoe at bihar cm nitish kumar arrested