Minor Rape Case in UP: महिलांवरील अत्याचार किंवा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अशी कोणती घटना उघड झाल्यावर किंवा त्यावरून लोकामधून मोठा आक्रोश व्यक्त झाल्यावर अशा शिक्षांवर वारंवार चर्चा होते. हे अपराधी सुधारण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना फाशीचीच शिक्षा दिली जावी, अशी मागणीही होते. लोकांमधलं हेच मत खरं ठरवणारी एक घटना उत्तर प्रदेशमध्ये समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणात जामीन मिळालेल्या नराधमानं पुन्हा त्या मुलीचं अपहरण करून महिनाभर तिच्यावर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

नेमकं काय घडलं?

हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या भोजपूर जिल्ह्यात घडला. सोमवारी पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्यानंतर त्यासंदर्भातली सविस्तर माहिती समोर आली. अटक करण्यात आलेला आरोपी वीरनाथ पांडे याला पोलिसांनी मे २०२४मध्ये एका १७ वर्षांच्या मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी अटक केली होती. पण त्याला काही दिवसांनी जामिनावर सोडण्यात आलं. पण जामिनावर सुटका झाल्यानंतर आरोपीनं पुन्हा त्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर महिनाभर बलात्कार केल्याचं स्पष्ट झालं आहे. फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पीडित मुलगी काही कामानिमित्त घराबाहेर पडली असताना आरोपीने ५ ऑगस्ट रोजी तिचं पुन्हा अपहरण केलं. जवळपास महिनाभर आरोपीनं पीडित मुलीला स्वत:च्या ताब्यात ठेवलं. या काळात तिच्यावर त्यानं अनेक वेळा बलात्कार केला. २ सप्टेंबर रोजी आरोपीनं पीडित मुलीला जांगीगंज रेल्वे पोलीस स्टेशनजवळ सोडून दिलं आणि पळ काढला.

पीडित मुलीनं पोलिसांना सांगितला सगळा प्रकार

आरोपीनं सोडल्यानंतर पीडित मुलीनं लागलीच पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. पोलिसांना घडला प्रकार सांगितला आणि आरोपीनं महिनाभर लैंगिक अत्याचार केल्याचंही सांगितलं. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तसेच, पोक्सो कायद्यानुसारही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता अनेक वेळा बलात्कार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.

Nalasopara Rape Case : बदलापूरनंतर आता नालासोपारा हादरले! तरुणीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी तिघांच्याही मुसक्या आवळल्या!

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. इटाहरा चौराहा परिसरातून पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.