Delhi Marathon Scandal: गेल्या महिन्यात पार पडलेली दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा अनेक चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. या मॅरेथॉनमध्ये स्पोर्ट्स कोट्यातील रेल्वे खेळाडू रेल्वेच्याच एका डॉक्टरच्या पत्नीचा बिब (शरीरावर घातलेला कागद ज्यावर खेळाडूचा नंबर लिहिलेला असतो) घालून धावली आणि मॅरेथॉन पूर्ण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यानंतर तिघांवर फसवणुकीचा आरोप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर कोणी दुसऱ्याच्या जागी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला तर त्याला फसवणूक मानले जाते, असे मॅरेथॉनच्या आयोजकांनी म्हटले आहे. मॅरेथॉनच्या व्यवस्थापकांनी त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली असून, त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

एनईबी स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि मॅरेथॉनचे व्यवस्थापक नागराज अडिगा यांनी सांगितले की, “अपोलो नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये (नॉन-एलिट कॅटेगरीजमध्ये) फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. आम्ही संबंधित तीन खेळाडूंना निलंबित केले आहे. आम्ही सोमवारी अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाला आमचा अहवाल सादर करणार आहोत. फेडरेशन त्यांच्या नियमांनुसार पुढील कारवाई करू शकते,” असे द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, धावपटूच्या वेगात अचानक झालेल्या बदलामुळे संशय निर्माण झाला. शर्यतीच्या पहिल्या टप्प्यात धावपटू खूप मंद गतीने धावत होती तर शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात तिचा वेग खूप वाढला. त्यानंतर याचे फोटो पाहिल्यानंतर स्पष्ट झाले की स्पोर्ट्स कोट्यातील खेळाडू डॉक्टरच्या पत्नीचा बिब घालून धावत होती.

मॅरेथॉनमध्ये, सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या वेळेची नोंद धावपटूच्या छातीवरील बिबवर टॅग केलेल्या चिपद्वारे केली जाते, यामध्ये बहुतेकदा ट्रान्सपॉन्डर किंवा RFID टॅग असतात. सुरुवातीला आणि शेवटी झालेल्या स्कॅनने धावपटूला शर्यत पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला हे समजते.

डॉक्टरांचे स्पष्टीकरण

या प्रकरणी क्रीडा कोट्यातील खेळाडूने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, डॉक्टरांच्या पत्नीनेही फोन उचलला नाही. पण, डॉक्टरांनी असा दावा केला की, या प्रकरणात कोणावरही बंदी घालण्यात आलेली नाही. ते म्हणाले की, “काहीही कारवाई झालेली नाही. मी व्यवस्थापनाचा भाग आहे. ती ३४ किमी चालल्यानंतर बेशुद्ध पडली. स्पोर्ट्स कोट्यातील खेळाडूने चुकून त्याचा बिब घातला आणि शर्यत पूर्ण केली.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathon bib switching scandal new delhi aam