फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपची मातृकंपनी ‘मेटा’ने जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी (एकूण मनुष्यबळाच्या १३ टक्के) कमी करण्याची घोषणा बुधवारी केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. झकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले असून, घटलेला महसूल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या समस्या हे यामागील कारण असल्याचं सांगितलं आहे. झकरबर्ग यांनी या निर्णयाची जबाबदारी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही सध्या जिथपर्यंत पोहोचलो आहोत त्याची आणि या निर्णयाची जबाबदारी मी घेत आहे,” असं झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर मेटा कर्मचाऱ्यांसाठी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. “हे सर्वांसाठी फारच कठीण असल्याची मला जाणीव आहे. ज्यांना याचा फटका बसला आहे त्यांची मी माफी मागतो,” असं झकरबर्ग यांनी सांगितलं आहे.

‘मेटा’कडून ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात; ट्विटरपाठोपाठ ‘फेसबुक’चे मोठे पाऊल

‘‘करोनाची साथ संपल्यानंतरही उत्पन्न वाढ कायम राहील, हे गृहीत धरून आक्रमकपणे नोकरभरती केली. मात्र दुर्दैवाने माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत,’’ असे झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘मेटा’ने सलग दोन तिमाहींमध्ये महसुलात मोठी घट नोंदवली आहे. कंपनीने ‘मेटाव्हर्स’ या नव्या संकल्पनेत तब्बल १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचाही परिणाम कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज अ‍ॅपलच्या खासगीकरण साधनांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप यांना वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याचाही फटका मेटा कंपनीला बसतो आहे. तरुणांमध्ये ‘टिकटॉक’ अधिक लोकप्रिय होत असून त्याची फेसबुकला तीव्र स्पर्धा आहे.

भारतातील ट्विटरचे कर्मचारी कपात करण्यास सुरुवात, इलॉन मस्कच्या आदेशानंतर मोठं पाऊल

वाढती स्पर्धा आणि घटणाऱ्या जाहिरातींमुळे आपला महसूल अपेक्षेपेक्षा कितीतरी प्रमाणात घटला आहे. त्यामुळे कर्मचारी कपात करावी लागत असल्याचं झकरबर्ग म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mark zuckerberg post letter for employees saying sorry for layoffs after meta decided to cut more than 11 thousand jobs sgy