गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर २००२ साली झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंड फरहतुल्ला घोरी हा तब्बल २२ वर्षांनंतर समोर आला आहे. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या घोरीचे नाव भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांशी जोडलेलं आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात तो भारताविरोधात युद्ध छेडण्याची चिथावणी देत आहे. घोरीच्या नव्या व्हिडिओमुळे भारतीय तपास यंत्रणा सजग झाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने सदर वृत्त दिले आहे. फरहतुल्ला घोरी हा मुळचा हैदराबादचा रहिवासी असून सध्या तो पाकिस्तानच्या लाहोर शहरात लपून बसला असल्याचे सांगितले जाते. घोरी भारतीय नागरिक असल्यामुळे पाकिस्तान त्याच्यापासून स्वतःचे हात झटकण्याचा प्रयत्न करू शकते, असे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे फरहतुल्ला घोरी?

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मागच्या वर्षी इस्लामिक स्टेटच्या धर्तीवर एका दहशतीवादी मॉडेलचा पर्दाफाश केला होता, त्याचे संचलन घोरी करत असल्याचे समोर आले होते. इस्लामिक स्टेट या संघटनेत नव्या लोकांना भरती करण्याच्या कामातही तो सक्रिय होता. फरहतुल्ला घोरी हा अबू सुफियान, सरदार सहाब आणि फारू या नावानीही ओळखला जातो.

२०१९ पर्यंत घोरीचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. पण टेलिग्राम आणि इतर मेसेजिंग अप्लिकेशनद्वारे तो व्हिडिओ प्रसारित करत असल्याचे २०१९ रोजी समजले. या व्हिडिओंमधून तरुणांची माथी भडकविणारे व्हिडिओ त्याच्याकडून प्रसारित करण्यात येत होते. भारताच्या गृह मंत्रालयाने २०२० साली त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. लाहोरमध्ये लपून बसलेल्या घोरीने अतिशय गुप्तपणे त्याच्या कारवाया केल्या. अमेरिका आणि इंटरपोलकडेही त्याचा ताजा फोटो नाही.

घोरीचा नवा व्हिडिओ हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज गुप्तचर यंत्रणानी व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने गुप्तचर अधिकाऱ्यांची एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात, आम्ही अनेक दहशतवाद्यांवर नजर ठेवून आहोत. पाकिस्तानने या दहशतवाद्यांवर एफएटीएफ (Financial Action Task Force) अंतर्गत कारवाई केली असल्याचे दाखवून स्वतःची बाजू सुरक्षित करून घेतली आहे. घोरीचा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तान तो भारतीय असल्याचे सांगून हात झटकू शकते.

घोरीकडून वापरात असलेले फेसबुक पेज आणि टेलिग्राम चॅनल्स भारतीय गुप्तचर यंत्रणांनी बंद केलं आहे. तेलंगणामध्येही त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळते का? यासाठी गुप्तचर यंत्रणा जंग जंग पछाडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोरी आणि त्याचे साथीदार फक्त तरूणांची माथीच भडकवत नाहीत, तर इस्लामिक स्टेटच्या नावाखाली जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा या संघटनाच्या नावाने पेजेस बनवून युवकांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न करतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mastermind of akshardham attack farhatullah ghori surfaced on social media calls for war against india kvg