MBBS student rape case : पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर कथितपणे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर ३६ तासांच्या आता पश्चिम बंगाल पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे, अशी माहिती आसनसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.
अद्याप पोलिसांनी याबद्दल अधिकृत निवेदन दिलेले नाही. “प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे, आणि त्यांना दुर्गापूर न्यायालयासमोर रविवारी हजर केले जाईल आणि आम्ही त्यांच्या कोठडीची मागणी करू,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, १० ऑक्टोबरच्या रात्री पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील कॉलेजच्या परिसरातून पीडितेला ओढत बाहेर आणण्यात आले आणि तिच्यावर कथितपणे बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर तिची प्रकृती स्थिर आहे.
पोलीस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेज परिसराच्या मागे असलेल्या जंगलात रात्रभर शोध मोहिम राबवण्यात आली. आरोपींपैकी एकाने वापरलेल्या मोबाईल टॉवरचे लोकेशन पोलिसांनी ट्रेस केल्यानंतर संपूर्ण जंगल परिसरात शोध घेण्यात आला, यासाठी ड्रोनचा वापर केला गेला आणि अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले, असेही सूत्रांनी सांगितले. तसेच त्यांनी गुन्हेगार हे आजूबाजूच्या गावातील स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगतले.
पुढील तपासात या घटनेत आणखी काही व्यक्तींचा सहभाग होता का आणि पीडितेच्या सोबत असलेल्या व्यक्तीचा गुन्ह्यात काही सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बालासोर येथील रहिवासी असलेली ती पीडित तरुणी ही तिच्या एका पुरुष मित्राबरोबर कॅम्पसच्या बाहेर गेली होती, तेव्हा तिला कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या जंगलात ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
पश्चिम बंगालचे मुख्य आरोग्य सचिव नारायण स्वरूप निगम म्हणाले की प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून पाच दिवसांत कारवाईचा अहवाल मागितला आहे.