ताजमहाल ही वास्तू म्हणजे एक  कब्रस्तान आहे. ताजमहाल हा स्थापत्य कलेचा कितीही सुंदर नमुना असला तरीही त्याची प्रतिकृती लोक घरात ठेवणे अशुभ मानतात असे ट्विट हरयाणाचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री अनिल विज यांनी केले आहे. ताजमहाल या विषयावरून सुरू असलेल्या वादात आता अनिल विज यांनीही उडी घेतली आहे. त्यांच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. याआधी भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर लागलेला डाग आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे अनेकजण नाराज झाले होते. संगीत सोम यांच्या भूमिकेवर टीकाही झाली होती. आता असेच काहीसे वक्तव्य अनिल विज यांनीही केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातील पर्यटन स्थळाच्या यादीतून ताजमहालचे नाव योगी आदित्यनाथ सरकारने हटवले आणि यावरून वाद सुरू झाला.  बादशहा शहाजान याने आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले, त्याला भारतातून हिंदूंचे अस्तित्त्व मिटवायचे होते.. असे लोक आपल्या इतिहासाचा भाग कसे असू शकतात? असा प्रश्न करत ताजमहालाचे नाव हटवण्यात आले. लवकरच औरंगजेब आणि इतर मुघल बादशहांचा इतिहासही पाठ्यपुस्तकातून वगळणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले.

भाजप नेते विनय कटियार यांनीही ताजमहाल हे महादेवाचे मंदिर आहे असा दावा केला. ताजमहालाचे नाव शेकडो वर्षांपूर्वी ‘तेजो महाल’  होते असे कटियार यांनी म्हटले आहे.  इतिहासकार पी. एन. ओक यांच्या पुस्तकाचाही दाखला त्यांनी यासाठी दिला होता.  ताजमहाल ही वास्तू पाहण्यासाठी भारतात देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र सध्या हाच ताजमहाल वादाचा विषय ठरताना दिसतो आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister of haryana says taj mahal is a beautiful graveyard