उज्जन येथील सिंहस्थ कुंभस्थळाच्या स्वच्छतेच्या कामात गुंतलेल्या सफाई कामगार व दलितांसोबत सरसंघचालक यांनी शुक्रवारी सहभोजन घेतले. येथील श्री गुरु कर्षनैक आश्रमात जमिनीवर मांडी घालून भागवत यांनी या लोकांच्या समवेत जेवण केले.
आश्रमाच्या व्यवस्थापनाने १२०० सफाई कामगारांना आमंत्रण दिले होते. यातील पुरुषांना शर्ट-पँट, तर महिला कामगारांना १०० रुपये व साडी भेट देण्यात आली असे आश्रमाचे प्रमुख स्वामी ओंकारानंदजी यांनी सांगितले.
भागवत यांनी गुरुवारी आदिवासी समाजाच्या लोकांसोबत क्षिप्रा नदीत पवित्र स्नान केले होते, तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर ठिकाणच्या आदिवासींच्या ‘जनजाती संमेलना’ला संबोधित केले होते. हिंदू संस्कृतीचा प्रारंभ आदिवासी संस्कृतीतून झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही बुधवारी कुंभमेळ्यातील दलित साधूंसोबत ‘समरसता स्नान’ व ‘समरसता भोज’ यामध्ये भाग घेतला होता. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून शाह यांनी ही कृती केल्याचे मानले जात आहे.