Monsoon Session 2025 : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ आणि गोंधळ पाहण्यास मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामाबाबत केलेला दावा आणि ऑपरेशन सिंदूर या दोन मुद्द्यावर खडाजंगी झाली.
ट्रम्प यांच्या दाव्यावरुन संसदेत गदारोळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रविराम घडवून आणल्याचा जो दावा केला होता त्या दाव्यावरुन आज लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे विरोधकांचा गदारोळ झाला. या गदारोळात राज्यसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं. तसंच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जस्टिस यशवंत वर्मा यांना हटवण्याचा प्रस्तावही संसदेत मांडला गेला. संसदेच्या दोन्ही सदनांची कारवाई सुरु झाली तेव्हा पहलगाम अतिरेकी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमध्ये लागू करण्यात आलेल्या एसआयएआर वर चर्चा करा ही मागणी विरोधकांनी केली आणि हंगामा करण्यास सुरुवात केली. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास चालू द्या अशी विनंती केली. मात्र विरोधकांनी घोषणा सुरु ठेवल्या आणि ते सगळे वेलमध्येच उभे होते. ज्यानंतर ओम बिर्ला यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभा तहकूब केली. १२ वाजता पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा पुन्हा एकदा वेलमध्ये उतरुन विरोधी पक्षातील खासदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करा अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांनी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. तुम्ही सदनाचं कामकाज चालू द्या. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरु राहिला.
आणि लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
दरम्यान लोकसभेतल्या या गदारोळानंतर राहुल गांधी यांनी बोलण्याची संमती मागितली जी त्यांना देण्यात आली नाही. ज्यामुळे पुन्हा गदारोळ झाला. ज्यानंतर लोकसभेचं कामकाज आधी चार वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत हा सगळा गदारोळ झाला तर राज्यसभेतही ट्रम्प यांच्या दाव्यावरुन गोंधळ पाहण्यास मिळाला.
राज्यसभेत काय घडलं?
राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्षातील खासदारांनी ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा करा अशी मागणी केली. नियम २६७ च्या अंतर्गत चर्चा करा अशी विनंतीही केली. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले देशावर जेव्हा पहलगामचा दहशवादी हल्ला झाला तेव्हा सगळे विरोधक सरकारच्या बरोबर उभे होते. पण २२ एप्रिलला झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर अजूनही तो हल्ला करणारे दहशतवादी सापडलेले नाहीत किंवा त्यांना शोधून ठार माऱण्यात आलेलं नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ वेळा हा उल्लेख केला की मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम घडवून आणला. देशासाठी ही बाब अपमानास्पद आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना जे. पी. नड्डा यांनी चोख उत्तर दिलं.
जे. पी. नड्डा काय म्हणाले?
मल्लिकार्जुन खरगे यांना सुरुवातीला जे.पी. नड्डा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नड्डा म्हणाले, सदनाबाहेर हा संदेश जाता कामा नये की सरकारला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची नाही. ऑपरेशन सिंदूर आठ दिवस राबवलं गेलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अशा प्रकारची मोहीम आपल्या देशात राबवली गेली नाही. दरम्यान एक बैठक पार पडली आणि त्यात असा ठराव मंजूर जाला की ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी लोकसभेत १६ तासांचा अवधी आणि राज्यसभेत ९ तासांचा अवधी दिला जावा. हा ठराव एकमुखाने मंजूर झाला.