नवी दिल्ली : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी राजस्थानच्या काही भागांत प्रवेश केल्याने तेथे मध्यम ते मुसळधार सरी बरसल्या. गेल्या २४ तासांत पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागांतही पाऊस झाला. दिल्लीत तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे चंडीगड-मनाली महामार्ग बंद झाल्याने शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. मध्य प्रदेशातही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राजस्थानात वीज कोसळून चार जण ठार
जयपूर: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी राजस्थानच्या काही भागांत प्रवेश केल्याने, उदयपूर, कोटा, बिकानेर आणि जयपूर विभागातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस आणि मुसळधार पाऊस झाला. पाली, चित्तोडगड आणि बारन जिल्ह्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाली येथे एका युवकाचा, बारन येथील पडपडी गावात दोन चुलत भावांचा आणि चितौडगढमध्ये एका दहा वर्षीय बालिकेचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. निम्बाडेहा उपविभागातील बडौली घाटा गाव परिसरात वीज कोसळून एका शेतात झाडाखाली बसलेले चार जण जखमी झाले. येत्या काही दिवसांत अजमेर, अलवर, बांसवाडा, बारन, भरतपूर, भिलवाडा, बुंदी, चित्तोडगड, धौलपूर, डुंगरपूर, जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अजमेर, भिलवाडा, टोंकसह काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ही दिला आहे.
पंजाब, हरियाणात पाऊस
चंडीगड : गेल्या २४ तासांत पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागांत पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हरियाणातील रोहतकमध्ये गेल्या २४ तासांत ९६.३ मिमी पाऊस झाला आहे. तर नारनौलमध्ये २४, कर्नालमध्ये २२.१, कुरुक्षेत्र १९.५ , गुरुग्राम ९.५ , अंबाला ७.४, सिरसा ४.९ आणि भिवानी १.७ मिमी पाऊस झाला. पंजाबमधील अमृतसरमध्ये सर्वाधिक ११३.२ मिमी पाऊस झाला. गुरुदासपूरमध्ये २६.७, फरीदकोटमध्ये २४.८, फिरोजपूरमध्ये १६ आणि पठाणकोटमध्ये १४.१ मिमी पाऊस झाला.
दिल्लीत तुरळक सरी
नवी दिल्ली : दिल्लीचे तापमान २५.४ अंश सेल्सिअसवर स्थिरावल्याने नागरिकांनी सुखद सकाळ अनुभवली. हे तापमान सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरात सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत दोन मिमी पाऊस झाला.
मध्य प्रदेशात इशारा
भोपाळ : हवामान विभागाने मध्य प्रदेशातील आठ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिवृष्टीचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे आणि २२ जिल्ह्यांत येत्या २४ तासांत मुसळधार पावसासाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. येत्या २४ तासांत (सोमवार सकाळी साडेआठ ते मंगळवार सकाळी साडेआठपर्यंत) मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (२०५.४ मिमी पेक्षा जास्त) आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, हवामान विभागाने बुऱ्हाणपूर, सागर, छिंदवाडा, सिवनी, नर्मदापुरम, बैतुल आणि हरदा या सात जिल्ह्यांत येत्या २४ तासांत (मंगळवार सकाळी साडेआठपर्यंत) काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज (११५.६ मिमी) वर्तवला आहे. या काळात भोपाळ, इंदूर आणि जबलपूरसह
राज्यातील २२ जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (६४.५ ते ११५.६ मिमी) ‘यलो अलर्ट’देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अवघा मध्य प्रदेश व्यापला आहे. राज्यात मेघगर्जनेसह, वीज कोसळण्याच्या घटनांत वाढ होऊ शकते.
गेल्या २४ तासांत भोपाळ, जबलपूर आणि शहडोल विभागातील जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी, उज्जैन, नर्मदापुरम, चंबळ या जिल्ह्यांत, ग्वाल्हेर आणि सागर विभागात अनेक ठिकाणी आणि इंदूर विभागातील जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस झाला.
हिमाचल प्रदेशात पूर, भूस्खलनामुळे महामार्ग ठप्प
सिमला/मंडी : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील औट येथे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे चंडीगड-मनाली महामार्ग बंद झाल्याने शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. मुसळधार पावसामुळे पांडोह-कुलू रस्त्यावर औटजवळ खोटीनाला येथे अचानक पूर आला.
पुरामुळे रविवारी सायंकाळपासूनच प्रवासी अडकून पडले होते. मंडी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की हा रस्ता साफ करण्याचे, दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्यावरून दरडीचे कोसळलेले मोठे दगड हटवण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. ते म्हणाले की चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग-२१ सुमारे सात-आठ तासांत वाहतुकीसाठी पूर्ववत होईल. तोपर्यंत या मार्गावरून तसेच मंडीकडे प्रवास न करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. मंडीहून चंडीगडला निघालेल्या प्रवाशांनी सांगितले, की ते रविवार संध्याकाळपासून येथे अडकले आहेत. रस्ता बंद असल्याने त्याच्या दुतर्फा अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. राज्यातील कांगडा, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कांगडा येथील धर्मशाला येथे सर्वाधिक १०६.६ मिमी पाऊस झाला.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वीज पडून २० जणांचा मृत्यू
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. या दरम्यान काही ठिकाणी वीज पडून किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. या दुर्घटना प्रामुख्याने पंजाब प्रांतातील सियालकोट आणि शेखूपुरा जिल्ह्यांत घडल्या आहेत. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूर येण्याचा इशाराही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. गेल्या वर्षी पुरात एक हजार ७३९ नागरिक मृत्युमुखी पडले होते.