Kangana Ranaut on Rahul Gandhi : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह दिसत आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत बोलत असताना राहुल गांधींच्या जातीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे इंडिया आघाडीतील पक्ष आता भाजपावर टीका करत आहेत. काँग्रेसने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. त्यातच या वादात आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनीही उडी घेतली आहे. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचा अवमान केला, असा आरोप केला जात असताना कंगना रणौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

कंगना रणौत काय म्हणाल्या?

कंगना रणौत यांनी राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते स्वतः जाहीररित्या कुणाचीतरी जात विचारत आहेत. या व्हिडीओसह त्यांनी एक कॅप्शनही लिहिले आहे. त्या म्हणाल्या, “स्वतःच्या जातीचा यांना पत्ता नाही. आजोबा मुस्लीम, वडील पारशी, आई ख्रिश्चन आणि हा पास्तामध्ये कडीपत्त्याचा तडका देऊन तयार केलेल्या खिचडीसारखा वाटतो. याला दुसऱ्यांची जात जाणून घेऊन काय करायचे आहे.”

हे वाचा >> “अधिक जगण्याची इच्छा नाही…”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची राज्यसभेतच उद्विग्न प्रतिक्रिया

कंगना रणौत यांची इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे कंगना रणौत म्हणाल्या की, कुणी जाहीररित्या कुणाची जात कशी काय विचारू शकतात. हे अतिशय लाजिरवाणे आहे. राहुल गांधी तुम्हाला शरम वाटली पाहीजे.

हे ही वाचा >> Pooja Khedkar UPSC News: पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय, भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास बंदी!

राहुल गांधी अंमली पदार्थ घेऊन येतात का?

कंगना रणौत यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला. “राहुल गांधी संसदेत विचित्र पद्धतीने बोलत असताना देव-देवतांची नावे घेतात. कसला तरी चक्रव्यूह असल्याचे सांगतात. मला तर शंका येते की, ते अंमली पदार्थांचे सेवन करून संसदेत येत असावेत, त्यामुळे त्यांची तपासणी झाली पाहीजे”, असेही त्या म्हणाल्या.

नेमके प्रकरण काय?

सोमवारी (दि. २९ जुलै) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर भाषण करून सरकारचा निषेध केला. यानंतर अनुराग ठाकूर यांनी भाषण करताना राहुल गांधींवर टीका केली. याबद्दल मंगळवारी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांच्यावर आरोप केले. अनुराग ठाकूर म्हणाले होते, “ज्याला स्वतःची जात माहीत नाही, तो जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे.” राहुल गांधी आणि काँग्रेसकडून जेव्हा अनुराग ठाकूर यांच्यावर टीका झाली, तेव्हा त्यांनी आपली बाजू सावरताना मी कुणाचेही नाव घेतले नसल्याचे म्हटले.

राहुल गांधी यावर बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडीने जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्ही माझा कितीही अवमान करा. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करूनच राहू. अनुराग ठाकूर यांनी माझा अवमान केला असला तरी मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही.