मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई भाजपा नेत्यांनी ममता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ममता बॅनर्जी यांनी या राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. आपल्या देशाचा अवमान करण्याचे काम ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रगीताच्या संदर्भात जो काही कायदा आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. कारण राष्ट्राभिमान महत्त्वाचा आहे. राष्ट्रगीत महत्त्वाचे आहे आणि त्याविषयी ममता बॅनर्जी इतक्या निष्काळजी असतील तर हे चुकीचे आहे. राजकारण यांना देशहितापेक्षा मोठे वाटत आहे. या सर्वांमध्ये त्यांनी राष्ट्रगीताला दुय्यम स्थान दिले आहे. याची शिक्षा देशाने आणि आपल्या राज्याने त्यांना दिली पाहिजे. पोलिसांनी ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करावा,” अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

“काँग्रेस बंगालमध्ये लढू शकते, तर तृणमूल..”; ममता बॅनर्जींचा काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न?

दरम्यान, भाजपाच्या पश्चिम बंगाल युनिटनेही राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल ममता यांना लक्ष्य केले. भाजपा बंगालने ट्विट करत, ‘ममता बॅनर्जी आधी बसल्या, नंतर उठल्या आणि मध्येच राष्ट्रगीत गाणे थांबवले. मुख्यमंत्री असताना त्यांनी बंगालची संस्कृती, राष्ट्रगीत आणि देशाचा तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला आहे, असे म्हटले आहे.

“काँग्रेसशिवाय भाजपाला कोणीही पराभूत करू शकत नाही”; ममतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा पलटवार

मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ममता यांचा एक व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे, ज्यामध्ये राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर काही सेकंदात त्या खुर्चीवरून उठताना दिसत आहेत. तर ‘द्रविड उत्कल बंग’ नंतर त्यांनी जय महाराष्ट्र, जय बिहार आणि जय भारत म्हणत राष्ट्रगीत गाणे थांबवले. आता भाजपा नेतेही ममता बॅनर्जींचा हा व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bjp filed police complaint against wb cm mamata banerjee for disrespect to national anthem abn