Bus Driver Watching Bigg Boss Video Viral: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३ साली मोबाइल फोनच्या वापरामुळे २,२४१ अपघातांची नोंद करण्यात आली. यात १,०४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही बस चालक गाडी चालवत असताना मोबाइलवर बोलणे, मेसेज करणे किंवा व्हिडीओ पाहण्यासारखे कृत्य करताना आढळत असतात. नुकतेच हैदराबाद येथे झालेल्या एका बस अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबई ते हैदराबाद धावणाऱ्या बसमधील एक धक्कादायक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई ते हैदराबाद मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचा वाहन चालक रात्री २.५० च्या सुमारास बस चालवत असताना मोबाइलवर बिग बॉस पाहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी बसचा वेग ८० किमी प्रति तास होता. ही घटना एका प्रवाशाने मोबाइलमध्ये कैद केल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या व्हिडीओची शॉर्ट क्लीप डिजिटल कंटेट क्रिएटर नागेश माने यांनी शेअर केला आहे. व्हिडीओवरील टेक्स्टमध्ये त्यांनी लिहिले की, अपघात होण्याचे एक कारण. सदर चालक मोबाइलवर बिग बॉस हा शो पाहत असल्याचेही त्यांनी म्हटले. व्हिडीओसह अपलोड केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, सदर व्हिडीओ २७ ऑक्टोबर रोजी मुंबई ते हैदराबाद प्रवासादरम्यान काढलेला आहे.
दरम्यान सदर व्हिडीओखाली कमेंट बॉक्समध्ये अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. काहींनी म्हटले की, लांब पल्ल्याच्या बसमध्ये चालकांचे हे वर्तन सामान्य आहे. झोप लागू नये, म्हणून अनेक चालक असे करत असतात, असा दावा एका युजरने केला. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, अशावेळी चालकाला ओरडण्याऐवजी त्याच्याबरोबर गप्पा मारा.
आणखी एका युजरने याच खासगी बस कंपनीचा धक्कादायक अनुभव शेअर केला. त्याने म्हटले की, त्याच्या वडिलांना या कंपनीच्या बसमध्ये प्रवास करत असताना बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली.
या व्हायरल पोस्टनंतर विजयानंद ट्रॅव्हल्स कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे आणि या चालकाला तात्काळ प्रभावाने कामावरून काढण्याचे आश्वासन दिले. “प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. अशा बाबी आम्ही गांभीर्याने घेत आहोत. अंतर्गत चौकशीनंतर आम्ही संबंधित दषी चालकाला कामावरून काढून टाकले आहे”, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले.
५ नोव्हेंबर रोजी तेलंगणातील चेवेल्लाजवळ बसची ट्रकला धडक झाली होती. ज्यामध्ये बस आणि ट्रकच्या चालकासह १९ जणांचा मृत्यू झाला होता.
