Nato chief big claim US Tariff Impact : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मालावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. याचा फटका भारतातील अनेक उद्योग क्षेत्रांना बसत आहे. यादरम्यान नाटोचे प्रमुख मार्ग रुटे (Mark Rutte) यांनी गुरूवारी एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा परिणाम म्हणून भारताने रशियाकडे युक्रेन युद्धासंबंधी धोरणाबद्दल स्पष्टीकरण मागिल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचाही दावा रुटे यांनी केला आहे.
न्यूयॉर्कमधील युएन जनरल असेंब्लीच्या पार्श्वभूमीवर सीएनएनशी बोलताना रुटे म्हणाले की, “ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा रशियावर मोठा परिणाम होत आहे. भारत सरकारचे पुतिन यांच्याशी फोनवर बोलणे सुरू आहे आणि नरेंद्र मोदी त्यांना युक्रेनबाबतच्या त्यांच्या धोरणावर स्पष्टीकरण मागत आहेत, कारण भारताला टॅरिफचा फटका बसत आहे.”
गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लादले होते, तसेच रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याच्या कारणाना अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्यात आले. यातून अमेरिकेचा उद्देश भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून परावृत्त करणे हा होता, अमेरिकेच्या मते भारत अप्रत्यक्षपणे रशियाच्या युक्रेनमधील युद्धाला निधी पुरवत आहे. ट्रम्प यांनी नाटो देशांना चीनवर देखील टॅरिफ लादण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून रशियन तेलाची खरेदी कमी होऊ शकेल.
भारत सरकारने अमेरिकेने लादलेल्या टॅरिफवर टीका केली होती, हे टॅरिफ अन्याकारक असल्याचे म्हटले होते. तसेच रशियाकडून तेल खरेदी करणे हे भारतातील १.४ अब्ज नागरिकांसाठी परवडणाऱ्या उर्जेचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असल्यावर देखील भर देण्यात आला होता. इतकेच नाही तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाखवून दिले होते की अमेरिका आणि युरोपियन यूनियन यांनी अशी आवश्यकता नसताना देखील रशियाबरोबर व्यापारी संबंध सुरू ठेवले आहेत.
ट्रम्प यांनी असेही सूचित केले होते की जेव्हा सर्व नाटो देश एकत्रितपणे रशियन तेल खरेदी करणे बंद करण्याचा निर्णय घेतील तेव्हा ते रशियवार आणखी मोठे कठोर निर्बंध लादण्यास तयार आहेत. ते म्हणाले की, काही देशांकडून रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे रशियाबरोबर वाटाघाटी करण्याची युतीची भूमिका कमकुवत होते.
भारत आणि अमेरिकेत काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क येथे व्यापार विषयक चर्चा पार पडली. ही चर्चा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली झाली.
गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी मोदींशी बोलण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते आणि त्यांनी मोदींचा उल्लेख ‘खूप चांगले मित्र’असा केला होता. यावर पंतप्रधान मोदींनी देखील प्रतिसाद दिला होता. सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे भारत-अमेरिका यांच्यातील अमर्याद क्षमता खुल्या होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला होता. तसेच दोन्ही देश जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार असल्याचेही मोदी म्हणाले होते.
दरम्यान रुटे यांनी केलेल्या या विधानावर भारत किंवा रशियाा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.