गडचिरोली : केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याची घोषणा करून नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी ३ महिन्यांपूर्वी शांतीवार्ता आणि युद्धविरामाची मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारकडून उत्तर न मिळाल्याने नक्षलवाद्यांचा प्रवक्ता भूपती ऊर्फ सोनू ऊर्फ अभयने पुन्हा एकदा शांतीवार्तेची मागणी केली आहे.
याआधी १५ ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघर्षविरामाची मागणी केली होती. या पत्रात एक महिन्यासाठी सशस्त्र संघर्ष थांबवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. तसेच सरकारसोबत संवाद साधण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. ‘कॉम्रेड अभय’ या नावाने हे पत्र प्रसिद्ध झाले होते. ‘आम्ही शांततेच्या दिशेने पाऊल उचलत आहोत, त्यामुळे सरकारनेही हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे पत्रात नमूद होते. तथापि, केंद्र सरकारकडून या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
अभिप्राय पाठवण्याचे आवाहन
शांतीवार्ता प्रस्तावाबाबत संघटनेतील अनेक मोठे नेते अनुकूल आहेत. संपर्कात नसलेले पण संघटनेत कार्यरत, तुरुंगात असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांचे देखील यासंदर्भात मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी देखील अभिप्राय पाठवावे, असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे. यासाठी पहिल्यांदाच नक्षल संघटनेने ई-मेल आणि फेसबुकचा पत्ता दिला आहे.