Nine Killed In Nepal Gen Z Protest: सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी आणि सरकारी भ्रष्टाचाराच्या विरोधात न्यू बानश्वरमध्ये रस्त्यावर उतरलेल्या २६ वर्षांखालील तरुणांच्या (जेन झेड) निदर्शनांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. द काठमांडू पोस्टने वृत्त दिले आहे की, निदर्शकांची पोलिसांशी चकमक झाल्याने आंदोलन हिंसक झाले आणि त्यामुळे काठमांडू जिल्हा प्रशासनाने न्यू बानश्वर परिसरात आणि आसपास कर्फ्यू लागू केला.

काठमांडूच्या ज्या भागात निदर्शने तीव्र झाली आहेत आणि कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तिथे सैन्य तैनात करण्यात आले आहे. संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण जमावाला पांगवण्यासाठी नेपाळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबर गोळ्या झाडल्या, असे अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

“आंदोलकांनी हिंसक वळण घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे,” असे वृत्तसंस्था रॉयटर्सने काठमांडू जिल्हा कार्यालयाचे प्रवक्ते मुक्तिराम रिजाल यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या तोफांचा, लाठ्यांचा आणि रबर गोळ्यांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे रिजाल म्हणाले.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाला?

नेपाळमधील एका निदर्शकाने सांगितले की, “काही वेळापूर्वी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये मला दुखापत झाली नाही, पण माझ्या मागे उभ्या असलेल्या माझ्या एका मित्राला गोळी लागली. त्याच्या हातात गोळी लागली आहे. गोळीबार अजूनही सुरू आहे आणि संसदेच्या आतूनही गोळीबाराचा आवाज येत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या माझ्या मित्राच्या डोक्यात गोळी लागली. पोलिस गुडघ्यांपेक्षा वर लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार करत आहेत. त्यांना हे करण्याची परवानगी आहे का?”

कालाकार, अभिनेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा

दरम्यान, हे आंदोलन आता तीव्र होत असताना, प्रमुख नेपाळी कलाकार आणि अभिनेत्यांनी याला आपला पाठिंबा व्यक्त केला आगे. नेपाळी अभिनेते मदन कृष्ण श्रेष्ठ यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “भ्रष्टाचार धोकादायक पातळीवर पोहोचला आहे आणि नेपाळ माता देखील रडत असल्याचे दिसते. तरुण हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांची स्वप्ने नेपाळच्या स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत. वर्षानुवर्षे असलेल्या अस्थिरतेमुळे प्रत्येक नागरिक निराश झाला आहे. हा आजच्या पिढीचा आहे. त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, नागरिकांच्या गरजा समजून घेणारे नेते निवडले पाहिजेत आणि देशाच्या आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजेत.”