लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने खासदारकीच्या स्वप्नांचा महाल भंगताच समीर भुजबळ आणि नीलेश राणे यांनी दिल्लीतील सरकारी घर सोडताना त्यात बरीच मोडतोड केल्याची चर्चा आहे. स्वत:साठी बसविलेल्या अनेक झगमगाटी सुविधा काढून नेण्याच्या त्यांच्या या ‘मोहिमे’मुळे अनेक भिंतींचीही दुर्दशा ओढवल्याने नव्या खासदारांना जागा देण्यात विलंब होत आहे.
खासदारांना दिल्लीत दिल्या जाणाऱ्या निवासस्थानांमध्ये पुरेशा सुखसोयी असतात. विजेची उपकरणे, एसी, फर्निचर आदी देण्यात येते. काही खासदार स्वखर्चाने निवासस्थानात बदल करतात. असे बदल खरे तर नियमबाह्य़ असतात. मग आधी घरात बदल करून आता तोडफोड केलेल्या माजी खासदारांना नोटीस पाठवणार का, यावर मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.
नीलेश राणे यांनी ९७ नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू या निवासस्थानातील छताला लावलेले आच्छादन, स्नानगृहामधील टाइल्स, वॉशबेसिन उखडून टाकले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी दरवाजेदेखील काढून नेल्याने त्यांच्या घरातील भिंती नव्याने उभाराव्या लागत आहेत, असे सांगितले जाते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी खासदार झाल्यावर १६९, साउथ अ‍ॅव्हेन्यू या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्वत: पदरमोड करून झगमगाट केला होता. समीर भुजबळ यांनी वॉश बेसिन तर सोडाच दिवाणखाना व शयनगृहाला विभागणारा दरवाजादेखील उखडून नेल्याचे समजते. स्नानगृहामधील महागडा आरसा, नळ, शॉवर आदी साहित्य  उखडून काढले आहे. स्नानगृहाच्या भिंतीला त्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. परिणामी सर्व टाइल्स बदलाव्या लागणार असल्याचे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भुजबळ यांनी घराच्या भिंतींना चकचकीत आवरण लावले होते. तेही काढण्यात आल्याने भिंत खराब झाली आहे. हे निवासस्थान दुरुस्त
करण्यासाठी दुप्पट मनुष्यबळ वापरावे लागेल. तेव्हा कुठे वेळेत इतर सदस्यासाठी वापरण्यायोग्य होईल, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. महात्मा फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करून नाशिकमध्ये कोटय़वधीचा महाल बांधणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांपैकी समीर यांच्या या कृत्याने अधिकारीही हैराण झाले आहेत.
या प्रकरणी गृह वितरण समितीचे अध्यक्ष खासदार किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भुजबळ व राणे यांनी निव्वळ विकृत मानसकितेतून हे कृत्य केले आहे. यंदा अनेक सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत. माजी खासदारांकडून निवासस्थान खाली करण्याची मोठी जबाबदारी होती. आतापर्यंत साधारण अडीचशे ते तीनशे निवासस्थाने ताब्यात घेण्यात आली आहेत. ताब्यात घेतलेल्या  निवासस्थानात डागडुजी, रंगरंगोटी, वीज-पाणी व्यवस्था, विद्युत उपकरणांच्या जोडणीला वेळ लागतो. निवासस्थानात तोडफोड झाली असेल तर दुरुस्तीसाठी तिप्पट वेळ लागतो. दुर्दैव म्हणजे केवळ तीन ते चार माजी खासदारांनी दिल्लीतील निवासस्थान सोडताना तोडफोड केली आहे. त्यात या दोघांचा समावेश आहे.
दरम्यान, नीलेश राणे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी दिल्लीतील निवासस्थानी कोणतीही तोडफोड केलेली नाही. निवासस्थान सोडताना सीपीडब्ल्यूडी कार्यालयाने मला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्या घराची अत्यंत वाईट अवस्था होती. मी ते राहण्यायोग्य केले. स्वखर्चाने विकत घेतलेले फर्निचर मी परत नेले, यात काहीही चुकीचे नाही.
– समीर भुजबळ

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane sameer bhujbal breakage government residence of delhi before leaving