Nitin Gadkari प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. The Wild Warfront असं यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज हे १०० टक्के सेक्युलर होते असं वक्तव्य केलं आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार कसा चालत असे यावरही भाष्य केलं आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजी भाषेत येतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास, कार्य कर्तृत्व याबाबत महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. मी इतकंच सांगेन लहानपणपासून आमच्या आई वडिलांहूनही जास्त स्थान आमच्या हृदयात ज्यांच्याबाबत होतं त्या व्यक्तीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते. रामदास स्वामींनी त्यांचं यथार्थ वर्णन केलं आहे, यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी. प्रत्येक गोष्टीत आदर्श कुणी असेल तर ते शिवाजी महाराज. एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते उत्तमच होतं. अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर जेव्हा भेट झाली. अफझल खानाने छत्रपती शिवरायांवर वार केला ज्यानंतर महाराजांनी खानावर वार केले. यामध्ये अफझल खानाचा मृत्यू झाला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा असे आदेश त्यांनी दिले. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणं हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे १०० टक्के सेक्युलर होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे संवेनदशील राजे होते-गडकरी

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या त्यावेळी ते सन्मानाने वागले. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्यासमोर आणली गेली तेव्हा ते म्हणाले की अशीच सुंदर अमुची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. तिला त्यांनी सन्मानाने घरी पाठवलं. महिलांचा आदर, प्रशासनात कठोर प्रशासक, लोकांसाठी संवेदनशील राजा आणि वेळ आल्यानंतर आपल्या मुलालाही शिक्षा करताना त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. आजच्या काळात ही शिकवण आवश्यक आहे. कारण आजकाल अनेक लोक आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तिकिट मागत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हेच होतं की राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

इंग्रजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टी लिहिल्या गेल्या-गडकरी

इंग्रजांच्या काळात जो इतिहास लिहिला गेला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनेक अशा गोष्टी समोर आल्या होत्या ज्या चुकीच्या आणि गैरसमज पसरवणाऱ्या होत्या. लुटारु असाही त्यांचा उल्लेख केला गेला. रयतेचं राज्य ही संकल्पना त्यांनी आणली होती. त्यांनी शौर्य आणि पराक्रम यांचा इतिहास रचला हे वास्तव आहे. शाहिस्तेखान अडीच लाखांचं सैन्य घेऊन पुण्यात आला होता. त्याला २० ते २५ जणांनी मिळून पळवून लावलं आहे. असा इतिहास असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार, त्यांचे मावळे, त्यांचे सरदार या सगळ्यांनाच प्रेरणा देण्याचं त्यांनी केलं. राष्ट्रासाठी प्राण अर्पण करण्याचं काम या योद्धांनी केलं. स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचं रुपांतर सुराज्यात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्शवत असं काम केलं आहे. आज आपल्या शासनपद्धतीतही छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं जातं असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari said chhatrapati shivaji maharaj was 100 percent secular king also said this thing about him scj