२०२४ च्या निवडणुकीमध्ये PM पदाच्या उमेदवारीसंदर्भात विचारलं असता नितीशकुमार म्हणाले, “मी तुम्हाला हात जोडून सांगतो…”

भाजपाने उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलंय.

२०२४ च्या निवडणुकीमध्ये PM पदाच्या उमेदवारीसंदर्भात विचारलं असता नितीशकुमार म्हणाले, “मी तुम्हाला हात जोडून सांगतो…”
नितीशकुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या एकीसंदर्भात भाष्य केलं आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी आपल्याला अनेकांचे फोन कॉल येत असल्याचंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.

“आम्हाला सर्वांना एकत्र करायचं आहे. मी सकारात्मक काम करत आहे. मी जे काम करत आहे त्यासाठी मला अनेकांनी कॉल केले आहेत. मी सर्वांना एकत्र आणण्याचं काम करतोय. मी यासाठी सर्वकाही करायला तयार आहे पण आधी मी माझं काम करेन,” असं नितीशकुमार यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये नितीशकुमार यांनी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्यासंदर्भाती बातम्या या अफवाच असल्याचंही यावेळेस बोलताना स्पष्ट केलं. “मी हात जोडून तुम्हाला सांगतोय की माझा असा कोणताही विचार नाहीय. मला सर्वांसाठी काम करायचं आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन काम करतील यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. जरं असं झालं तर फार चांगलं होईल,” असंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.

याच आठवड्याच्या सुरुवातीला ७१ वर्षीय नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपाशी काडीमोड घेतला. केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला धक्का देत नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत महागठबंधनचे सरकार स्थापन केले.

नितीशकुमार यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे त्यांनी भाजपाला धोका दिल्याची भावना भाजपा नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र नितीशकुमार यांनी हे आरोप फेटाळून लावताना भाजपाचा दावा हा तर्कशून्य असल्याचं म्हटलंय.

“जे मला काही गोष्टींसाठी दोष देतील आणि माझ्यासंदर्भात नको ते दावे करतील त्यांना त्यांच्या पक्षात अशा वक्तव्यांचा काहीतरी फायदा होणार असेल. ज्यांच्याकडे त्यांच्या पक्षाने दुर्लक्ष केलं आहे असे लोक माझ्याबद्दल बोलणार असतील तर त्यामधून त्यांना पक्षाचा सदस्य म्हणून काहीतरी फायदा होणार आहे हे उघड आहे,” असंही नितीशकुमार यांनी म्हटलंय.

भाजपाने उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेला उत्तर देताना नितीशकुमार यांनी हा प्रश्न विचारण्याचा भाजपाला हक्क नसल्याचं म्हटलं आहे. “त्यांनी याला का विरोध करावा कळत नाही. ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना का सुरक्षा मिळू नये? ते काहीही बोलत आहेत,” असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.


मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तेजस्वी यादव यांचे मोदी सरकारला आव्हान; म्हणाले ‘’तपास यंत्रणांनी माझ्या घरी….’’
फोटो गॅलरी