बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची रविवारी जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे राज्याबाहेर विस्तार करू पाहणाऱ्या आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या या पक्षावर नितीशकुमार यांची संपूर्ण पकड राहणार आहे.
जेडी (यू)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कुमार यांची पक्षाच्या सर्वोच्चपदी निवड करण्यात आल्यामुळे गेले दशकभर या पदावर असलेल्या शरद यादव यांची कारकीर्द संपुष्टात आली. स्वत: यादव यांनीच चौथ्यांदा हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता.
कुमार यांचे नाव शरद यादव यांनी सुचवले आणि सरचिटणीस के.सी. त्यागी व सचिव जावेद रझा यांनी त्याला अनुमोदन दिले. २३ एप्रिलला पाटणा येथे होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत कुमार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये पक्षाची धूळदाण झाल्यानंतर नितीश यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवून सत्ता हस्तगत केली होती. नव्या पदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी समान विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली, असे त्यागी यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर निर्णायक विजय मिळवताना जेडी (यू)- राजद- काँग्रेस आघाडीचे नेतृत्व केल्यानंतर कुमार यांचा पक्ष अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा या पक्षांशी विलीनीकरणाबाबत बोलणी करीत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांकडे आम्ही २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकींपूर्वीची महत्त्वाची लढाई म्हणून पाहत असल्याचे त्यागी म्हणाले.