North Bengal flood landslides death toll : उत्तर बंगाल आणि विशेषतः दार्जिलिंगच्या डोंगराळ भागात पुराने थैमान घातले असून या पुरात प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या पुरात अनेकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या २० च्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी नबन्ना (राज्य सचिवालय) येथे एक उच्च-स्तरीय बैठक घेतली.

ममता बॅनर्जी यांनी २४/७ नियंत्रण कक्ष सुरू केला असून, त्या स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि इतर अधिकारी सोमवारी उत्तर बंगालला भेट देणार आहेत. “उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगालमधील अनेक भागात काल रात्री काही तास अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि बाहेरून आपल्या राज्यात नदीचे अतिरिक्त पाणी आल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मी खूप काळजीत पडले आहे,” असे ममता बॅनर्जी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, उत्तर बंगालमध्ये १२ तासांत ३०० मिलीमीटरपेक्षा जास्त इतका पाऊस अचानक झाला. याबरोबरच संकोश नदीमध्ये आणि भूतान व सिक्कीममधून येणाऱ्या नदीच्या पाण्यात एकाच वेळी प्रवाह वाढला.

अतिवृष्टी आणि नदीच्या पुरामुळे आम्ही काही बंधू आणि भगिनींना गमावल्याचे कळाल्याने धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करते आणि या कुटुंबांना तात्काळ मदत पाठवली जाईल, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, दोन लोखंडी पूल कोसळले आहेत, अनेक रस्ते खराब झाले आणि पाण्याखाली गेले आहेत. तसेच, दार्जिलिंग, कालिपोंग, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार या जिल्ह्यांमधील मोठा भूभाग जलमय झाला आहे. तसेच मिरिक, दार्जिलिंग, कालीमोंग, जलपाईगुडी, माटिगरा आणि अलीपूरद्वार येथे प्रचंड नुकसान झाल्याचेही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

“मी काल रात्रीपासूनच चौवीस तास परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहे. . मी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (DG of Police), उत्तर बंगालमधील जिल्हाधिकारी (DMs) आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत एक व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीला गौतम देव आणि अनित थापा यांसारखे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. मी कामय संपर्कात आहे आणि मी यासंदर्भात उद्या मुख्य सचिवांसह स्वत: उत्तर बंगाल येथे जात आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना त्यांना सुखरूप बाहेर काढले जात नाहीत तोपर्यंत त्यांनी ते जिथे आहेत तेथेच थांबण्याचे आवाहन केले आहे. “दरम्यान, आम्ही उत्तर बंगालमधील पर्यटकांना आमचे पोलिस त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढत नाही तोपर्यंत त्यांनी ते जिथे आहेत तिथेच राहवे असा सल्ला देत आहोत,” असे त्यांनी लिहिले आहे. दार्जिलिंग हे एक प्रमुख पर्यटन स्थळ असून पावसामुळे सध्या तेथे हजारो लोक अडकले आहेत .