Balasore college harassment ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने कॉलेजमधील एका शिक्षकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली. मात्र, तिच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थिनीने कॉलेजच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतले. तिने तिच्या मृत्यूपूर्वी आपल्याबरोबर काय घडत आहे याची माहिती काही महिन्यांपूर्वी तिच्या मैत्रिणींना दिली होती. एनडीटीव्हीशी बोलताना पीडितेच्या एका मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमधील विद्यार्थिनीला तिच्या विभागप्रमुख समीर कुमार साहूकडून अनेक महिन्यांपासून मानसिक आणि शैक्षणिक छळ सहन करावा लागत होता.
पिडीतेच्या मैत्रिणीने काय सांगितले?
पिडीतेची मैत्रीण म्हणाली, “काही महिन्यांपूर्वी तिने मला सांगितले की तिच्या विभागप्रमुखांकडून तिचा छळ केला जात आहे. तिने उघड केले की, विभागप्रमुख तिला जाणूनबुजून परीक्षेत नापास करत आहेत. त्यावेळी, मी किंवा इतर कोणीही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी तिची इच्छा नव्हती. परंतु, ३० जून रोजी, तिने आम्हाला विभागप्रमुखांना भेटण्यासाठी आणि विभागप्रमुखांविरुद्ध गंभीर कारवाईची मागणी करण्यासाठी एकत्र केले. याचे कारण म्हणजे तिला वर्गात त्रास दिला जात होता. तिने आम्हाला सांगितले की विभागप्रमुखांनी इतरांसमोर तिच्याशी गैरवर्तन केले, तिला ब्लॅकमेल केले आणि सहा वर्ष कॉलेजमध्ये याच परिस्थितीत अडकवण्याची धमकी दिली,” असे मैत्रिणीने ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.
मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार, ३० जून रोजी, बी.एड अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात असलेल्या पिडीत विद्यार्थिनीने तिच्या वर्गमित्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापैकी एकाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून विभागप्रमुखांविरुद्ध कारवाईची मागणी करावी, अशी तिची इच्छा होती. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी फकीर मोहन महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप घोष यांच्याशी संपर्क साधला. “प्राचार्यांनी निर्णय घेण्यासाठी काही प्रक्रिया आहेत आणि त्यासाठी अधिक वेळ हवा असल्याचे सांगितले,” असे पिडीतेची मैत्रिण म्हणाली.
“१२ दिवसांनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. विद्यार्थिनी पुन्हा एकदा प्राचार्यांकडे जाऊन तोडगा काढू इच्छित होती. परंतु, प्रवेश सुरू असल्याने कॅम्पसमध्ये गर्दी होती. २० मिनिटांच्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही काही वेळेसाठी कॅम्पसमधून बाहेर पडलो आणि तितक्यात आम्हाला एक फोन आला की, तिला स्वतःला पेटवून घेण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. मी असे म्हटले कारण मला वाटते की, विभागप्रमुखांनी असे काहीतरी म्हटले असेल ज्यामुळे तिला त्रास झाला आणि तिने असे कठोर पाऊल उचलले. न्यायासाठी लढत असताना ती पूर्णपणे तुटली होती आणि थकली होती,” असे मैत्रिणीने ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.
कॉलेज कॅम्पसमध्ये त्यादिवशी काय घडले?
विद्यार्थिनीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ज्योतिरंजन बिस्वाल नावाच्या एका विद्यार्थ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यात तो १५ टक्के भाजला. मात्र, पीडिता ९५ टक्के भाजली आणि १४ जुलै रोजी एम्स भुवनेश्वरमध्ये तिचा मृत्यू झाला. मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार, साहूविरुद्धच्या सुरुवातीच्या तक्रारीनंतर त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा पाठिंबा गोळा केला, तर केवळ १५ ते २० विद्यार्थी पीडितेच्या बाजूने उभे होते.
“विभागप्रमुखांनी सुमारे ३०० विद्यार्थ्यांना आपल्या बाजूने उभे केले. त्याने जवळजवळ १०० विद्यार्थ्यांना तिच्या विरोधात जाण्यास भाग पाडले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय सदस्या म्हणून आगामी निवडणुकीपूर्वी तिचा वापर करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले, प्राचार्यांना अर्ज लिहून तिच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिच्यावर आरोप केले. विडंबन म्हणजे, आता तेच विरोधक न्यायाबद्दल बोलत आहेत,” असे मैत्रिणीने एनडीटीव्हीला सांगितले.
महाविद्यालयाचे दोन अधिकारी म्हणजेच विभागप्रमुख समीर कुमार साहू आणि प्राचार्य दिलीप घोष यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, लैंगिक छळ करणे आणि महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.