भाजपाच्या एका खासदाराने भर लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ केल्याचा प्रकार नुकताच पाहायला मिळाला आहे. लोकसभेतील चर्चेवेळी चांद्रयान मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप विरोधी बाकांवरून करण्यात आला होता. त्यावर भाजपाचे दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी संतापले आणि विरोधकांना उत्तर देऊ लागले. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली उठून काहीतरी बोलू लागले. यावर बिधुरी म्हणाले, “मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..तुला कधी उभं रहून बोलू देणार नाही. ए उग्रवादी..कटवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत… हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश बिधुरी यांच्या या वक्तव्यानंतर बिधुरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर देशभरातून टीका होत आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ते फक्त दहशतवादी म्हणाले असते तर त्याची आम्हाला सवय झाली आहे. तुम्ही माझं सोशल मीडिया अकाउंट बघा. आम्हाला दहशतवादी बोलताना हे लोक कधीच थकत नाहीत. परंतु, दहशतवादी शब्दाबरोबर ते (बिधुरी) जे काही बोलले, त्यांचे ते शब्द मला इथे बोलून दाखवायचे नाहीत. मला या सगळ्याची लाज वाटते. आपल्या संसदेत अशा प्रकारचे शब्द वापरले गेल्याची मला लाज वाटते.

ओमर अब्दुल्ला म्हणाले, त्यांचे शब्द ऐकून मी नाराजही झालो, कारण ते शब्द देशातल्या तमाम मुसलमानांसाठी वापरले गेले आहेत. मला एक गोष्ट कळत नाही की जे मुसलमान भाजपात आहेत किंवा भाजपाशी संबंधित आहेत, ते लोक हे सगळं कसं काय सहन करतात? मी भाजपाबाहेर आहे तरीदेखील हे सहन करणं मला अवघड जातंय. परंतु, जे लोक भाजपाबरोबर मिळून काम करत आहेत त्या लोकांना रात्री झोप कशी येते? आपलेच सहकारी आपल्याबद्दल अशा प्रकारचा विचार करतात हे समजल्यावर त्यांना झोप कशी लागते?

हे ही वाचा >> “मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही”, रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते म्हणाले, त्यांनी वापरलेले हे शब्द तमाम मुस्लीम समाजाबद्दल आहेत. हे सगळं केवळ एका खासदाराबद्दल नाही. यामधून कळतंय की त्यांचे (भाजपा) मुसलमानांबद्दल काय विचार आहेत. ते आमच्याबद्दल नेमका काय विचार करतात ते यातून समजतंय. सरकारला याची लाज वाटली पाहिजे. देशाची संसद नवी आहे परंतु, तिथल्या लोकांचे विचार मात्र तेच जुने आणि घाणेरडे आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omar abdullah slams bjp mp ramesh bidhuri after communal words in lok sabha asc