सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आणि तीन सुरक्षा जवान जखमी झाले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. सुकमा-दंतेवाडा सीमेवरील जंगलामध्ये विशेष कृती दल, जिल्हा राखीव दल आणि सीआरपीएफने नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली होती.
त्यावेळी झालेल्या चकमकीत आयईडीचा स्फोट होऊन नक्षलवादी ठार झाला. परिसरामध्ये माओवादी दडून बसल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्यानंतर सोमवारपासून शोधमोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक किरन चव्हाण यांनी सांगितले. घटनास्थळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. यंदाच्या वर्षात विविध चकमकींमध्ये २२६ नक्षलवादी ठार झाले आहेत.