Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर भारताने मोठी कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती भारतीय डीजीएमओच्या (DGMO) तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांमध्ये ३ मुख्य दहशतवादी देखील मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. कंदहार विमान अपहरण प्रकरण आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमदचाही खात्मा करण्यात आल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे.

१०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, “९ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. ज्यामध्ये यूसुफ अजहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद अशा दहशतवाद्यांचा देखील समावेश होता. जे आयसी-८१४ विमान कंदाहार अपहरण आणि पुलवामा स्फोटात सहभागी होते.”

LOC वर पाकिस्तानचे ३५ सैनिक ठार

भारताने दिलेल्या प्रत्युत्तराबाबत DGMO राजीव घई यांनी माहिती देताना सांगितलं की, ७ ते १० मे या कालावधीत नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तरात किमान ३५ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाले आहेत, अशी माहिती भारताचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’ने काय साध्य केलं?

एअर मार्शल ए.के.भारती यांनी सांगितलं की, “ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट साध्य झालं. तसेच ऑपरेशन सिंदूरमुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे. दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्याचं आमचं उद्दिष्ट साध्य झालं का? आपण असं विचारलं तर याचं उत्तर हो असं आहे, तसेच त्याचे परिणाम जगासमोर आहेत. ऑपरेशन सिंदूर हे ‘बॉडी बॅग्ज’ मोजण्यासाठी नाही तर नेमलेल्या लक्ष्यांवर अचूकपणे मारा करण्याचं उद्दिष्ट होतं. आम्ही ऑपरेशन सिंदूर कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही मार्गाने निवडलं असलं तरी त्याचा शत्रूच्या लक्ष्यांवर मोठा परिणाम झाला. आता किती जीवितहानी झाली? किती जखमी झाले? आमचं उद्दिष्ट जीवितहानी करणं नव्हतंच, तर जर काही झालं असेल तर ते मोजणं त्यांचं काम आहे. आमचं काम लक्ष्यावर मारा करणं आहे”, असंही मार्शल भारती यांनी म्हटलं.