मथुरा : मथुरेत जन्माष्टमीनिमित्त गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थातून विषबाधा होऊन १२०हून अधिक महिला आणि मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. जन्माष्टमीनिमित्त उपवास केलेल्या व्यक्तींनी पिठापासून बनवलेल्या पुरी आणि समोसे खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर तसेच इतर लक्षणे जाणवू लागली होती.

हेही वाचा >>> बलुचिस्तानमधील हल्ल्यांचा चीनकडून निषेध; पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईचे समर्थन

मथुरा जिल्ह्यातील फराह पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावांतून रात्रीच्या वेळी प्रसादातून विषबाधा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आरोग्य विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाचे प्रभारी डॉ. भुदेव प्रसाद यांनी सांगितले. विषबाधा झाल्यानंतर भाविकांना सुरुवातीला फराह कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णांचा आकडा वाढल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय तसेच वृंदावन आणि आग्रा येथील एसएन वैद्याकीय महाविद्यालयात हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

विषबाधा झालेले भाविक परखम, बडोदा, मिर्झापूर, मखदूम आणि खैरात गावातील आहेत. त्यांनी गव्हाचे पीठ झगडू आणि राजकुमार या दोन पुरवठादारांकडून खरेदी केले होते. तर फराहमधील प्रमुख किराणा व्यापाऱ्यांकडून त्यांनी या वस्तू खरेदी केल्या होत्या. जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी जिल्हा अन्न व औषध प्रशासनाला पुरवठादारांच्या दुकानांवर छापे टाकून दुकाने सील करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून आरोपी दुकानदारांचा शोध सुरू आहे.