बीजिंग : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत ३७ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांचा चीनने मंगळवारी तीव्र निषेध करून पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी मोहिमेला समर्थन जाहीर केले आहे. ‘चीन सर्वप्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा ठामपणे विरोध करतो आणि दहशतवादविरोधी कारवाया पुढे नेण्यासाठी, सामाजिक एकता आणि स्थिरता राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला खंबीरपणे पाठिंबा देत राहील’, असे बलूच हल्लेखोरांच्या कृत्याचा निषेध करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जीआन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा >>> CJI DY Chandrachud : “मीटिंगला जायचंय, ५०० रुपये पाठवा”, स्कॅमरने सरन्यायाधीशांच्या नावाने टॅक्सीसाठी पैसे मागितले; पुढे काय झालं?

प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी चीन पाकिस्तानबरोबर दहशतवादविरोधी आणि सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करण्यास इच्छुक आहे, असेही लिन म्हणाले. चीनचे उच्च लष्करी अधिकारी सुरक्षा मूल्यांकनासाठी विशेषत: ६० अब्ज डॉलरच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीबीईसी) च्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला भेट देत असताना, बलुचिस्तानमध्ये हे दोन दहशतवादी हल्ले झाले. या कॉरिडॉरला बलूच दहशतवाद्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशात बंडखोरांकडून हल्ले होत असताना, सशस्त्र बलूच हल्लेखोरांनी सोमवारी पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात विविध ठिकाणी हल्ले करून ३७ नागरिक ठार केले. पहिल्या घटनेत बलुचिस्तानच्या मुसाखेल जिल्ह्यातील एका हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील किमान २३ लोक मारले गेले. दुसऱ्या घटनेत बलुचिस्तानमधील क्वेट्टापासून १५० किमी दक्षिणेकडील कलात येथे सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ११ जण ठार करण्यात आले.