Pakistan Afghanistan border clashes : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष उफाळून आला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले आणि सीमावर्ती भागांतील चौक्यांवर हल्ला चढवला. यानंतर अफगाणिस्तानने देखील त्याला प्रत्युत्तर दिले. काही दिवसांच्या या संघर्षानंतर अखेर पाकिस्तान आणि तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकार यांच्यात बुधवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजल्यापासून ४८ तासांच्या युद्ध विरामावर सहमती झाली आहे. याबद्दलची घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी गुंतागुंतीच्या पण सोडवता येण्याजोग्या समस्येवर सकारात्मक उपाय शोधण्यासाठी संवादाचा मार्ग वापरण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. मात्र याबद्दल तालिबान सरकारकडून अद्याप पुष्टी मिळालेली नाही.
सीमेलगतच्या भागात झालेल्या ताज्या संघर्षात अनेक जण जखमी आणि ठार झाल्यानंतर, ही घोषणा करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री दक्षिण अफगाणिस्थानच्या स्पिन बोल्डक (Spin Boldak) जिल्ह्यात आणि पाकिस्तानच्या चमन जिल्ह्यातील दुर्गम भागात हा संघर्ष पेटला होता. विशेष म्हणजे, या संघर्षासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांना दोष दिला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये, अफगाण तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी सैन्यावर लाईट आणि हेवी शस्त्रांनी गोळीबार केल्याचा आरोप केला. या हल्ल्यात १२ नागरिक ठार आणि १०० हून अधिक जखमी झाल्याचा दावा केला आहे. स्पिन बोल्दाक प्रेस प्रवक्ते अली मोहम्मद हकमल यांनी १५ नागरिकांच्या मृत्यू झाला असल्याचे सांगितले. एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींमध्ये ८० महिला आणि मुलांचा समावेश आहे.
मुजाहिद यांनी दावा केला की अफगाण सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तसेच त्यांनी शस्त्रे आणि टँक ताब्यात घेतले आणि मिलिट्री इंन्स्टॉलेशन्स नष्ट करण्यात आले.
पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे काय?
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मात्र तालिबान सैन्याने आधी एका लष्करी चौकीवर आणि जवळपासच्या भागात गोळीबार केला, ज्यामुळे संघर्ष पेटला ज्यामध्ये चार पाकिस्तानी नागरिक जखमी झाले. रॉयटर्सने एका सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे पाच तास चाललेल्या या संघर्षात सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. मात्र या काळात दोन्ही बाजूच्या सीमेजवळच्या रहिवाशांना या संघर्षामुळे घरे सोडून पळून जावे लागले.