Pakistan Airstrikes on Afghanistan : दोन दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर अखेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बुधवारी (१५ ऑक्टोबर) तात्पुरता युद्धविराम झाला. मात्र, पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर आलेलं दिसत नाही. कारण युद्धविरामाच्या घोषणेनंतरही पाकिस्तानने आपल्या कुरापती चालूच ठेवल्या आहेत. पाकिस्तानने शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) युद्धविरामाचं उल्लंघन करत अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यात दोन लहान मुलांसह सहा जण दगावले आहेत. तर, १० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

टोलो न्यूजने शुक्रवारी सूत्रांच्या हवाल्याने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की अफगाणिस्तानमधील अरगुन व बरमाल जिल्ह्यांमधील रहिवासी भागात हल्ला झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा महिलांसह १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानने सामान्य जनतेच्या घरांवर हल्ला केला आहे.

चोख प्रत्युत्तर देणार : अफगाणिस्तान

दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने म्हटलं आहे की “आता युद्धविराम संपला, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल.”

एका बाजूला, पाकिस्तानने तणाव कमी करण्यासाठी आणि हिंसाचार रोखण्यासाठी दोहा येथे होणाऱ्या चर्चेच्या समाप्तीपर्यंत युद्धविराम वाढवण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजूंमधील ही चर्चा शनिवारी सुरू होणार आहे. अशातच पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ला करून लोकांचा संताप ओढवून घेतला आहे.

युद्धसमाप्तीसाठी दोहा येथे चर्चा

अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ शनिवारी दोहा येथील चर्चेसाठी रवाना होईल. तर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ व लष्करप्रमुख असीम मुनीर पाकिस्तानी शिष्टमंडळासह दोहा येथे दाखल झाले आहेत.

दोहा येथील चर्चा फिस्कटणार?

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने युद्धविरामाबाबत म्हटलं होतं की “तालिबानच्या विनंतीवरून दोन्ही बाजूच्या परस्पर संमतीने पाकिस्तानचं सरकार व अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट यांच्यात बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविरामाचा निर्णय घेतला आहे.” मात्र हे ४८ तास पूर्ण होण्याआधीच पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील रहिवासी भागात हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे उभय देशांमधील वाद आणखी चिघळू शकतो. तसेच दोहा येथील चर्चेवर याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.