Pakistan Army Air Strike : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी सैन्याने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील एका गावावर हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात तब्बल ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तानी हवाई दलाच्या सैन्याने सोमवारी या गावातील एका भागावर एलएस-६ बॉम्ब हा बॉम्ब टाकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांसह किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतात तिराह खोऱ्यामधील मात्रे दारा हे गाव आहे. याच गावावर पाकिस्तानच्या हवाई दलाच्या सैन्याने पहाटे बॉम्ब हल्ला केला. हा हवाई हल्ला जेएफ-१७ या लढाऊ विमानांमधून करत एलएस-६ बॉम्ब टाकण्यात आले. यामध्ये ३० जणांच्या मृत्यूसह अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप पाकिस्तान सरकारने या घटनेला पुष्टी दिलेली नाही. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या हवाई हल्ल्यामुळे त्या गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अचानक झालेल्या हल्यामुळे गावात मोठा गोंधळ उडाला आहे. गावातील अनेक नागरिकांना मोठ्या स्फोटांचा आवाज ऐकू आल्याचं सांगितलं जात असून यामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांचे घरे उद्ध्वस्त झाले आहेत. एवढंच नाही तर अनेक नागरिक बेपत्ता असून ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता जे बेपत्ता आहेत, त्याचा शोध घेतला जात असून जे जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
काही स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे की पाकिस्तानी हवाई दलाने या भागातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. मात्र, या कारवाईत सर्वसामान्य नागरिकांचा बळी केला आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात खैबर पख्तूनख्वामध्ये अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या डोंगराळ प्रांतात लपलेल्या दहशतवाद्यांवर अनेक लष्करी कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच ही एक कारवाई होती. मागील काही दिवसांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचं चित्र असून प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या प्रांतांमध्ये या कारवाया दिसून येत आहेत.