एक्स्प्रेस वृत्त

दुबई : देशाच्या नवीन संरक्षण करारानुसार ‘गरज पडल्यास सौदी अरेबियाला आमच्या देशाचा अणुकार्यक्रम उपलब्ध करून दिला जाईल,’ असे विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी शुक्रवारी केले. संरक्षणमंत्र्यांच्या या विधानाने पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या लष्करी संबंधांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील संरक्षण करारावर भारताने सावध पवित्रा घेत पाकिस्तानशी संरक्षण करार करताना सौदी अरेबियाने ‘परस्परहित आणि संवेदनशील मुद्दे लक्षात घ्यावेत’, अशी अपेक्षा केली आहे.

सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान अब्दुलाझिझ अल सौद आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांतील सामरिक संरक्षण करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या केल्या. विश्लेषकांच्या मते, पश्चिम आशियातील एकमेव अण्वस्त्रधारी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलला एक संदेश म्हणून हा करार करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये हमास नेत्यांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि इस्रायल-हमास युद्धाने गाझा पट्टी उद्ध्वस्त केली आहे. परिणामी हा प्रदेश धोक्यात आला असून, त्यामुळे आखाती अरब राष्ट्रांमध्ये सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त झाल्या.

गुरुवारी रात्री उशिरा दूरचित्रवाणी मुलाखतीत बोलताना आसिफ म्हणाले, की ‘पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दल मी एक मुद्दा स्पष्ट करतो, जेव्हा आम्ही चाचण्या केल्या तेव्हाच ही क्षमता सिद्ध झाली. तेव्हापासून आमच्याकडे युद्धभूमीसाठी प्रशिक्षित सैन्य आहे.’ ‘आमच्याकडे जे आहे आणि आमच्याकडे असलेल्या क्षमता या करारानुसार (सौदी अरेबियाला) उपलब्ध करून दिल्या जातील,’ असेही ते म्हणाले. आम्ही अशा कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही, ज्याच्या हल्ल्यामुळे त्यांना आपोआप प्रत्युत्तर मिळेल. सौदी अरेबियानेही कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही, असे आसिफ यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.