Pakistan Jaffar Express Explosion Balochistan : बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा ट्रेनवर हल्ला झाला आहे. यावेळी हल्लेखोरांनी जाफर एक्सप्रेसला लक्ष्य केलं आहे. जाफर एक्सप्रेसमध्ये मोठा स्फोट घडवून आणला असून यामुळे एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले आणि मोठा अपघात झाला. सिंध प्रांतातील सुलतानकोट भागात हा हल्ला झाला आहे. हा स्फोट आणि त्यानंतर झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. ही एक्सप्रेस खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर शहरातून बलुचिस्तानमधील क्वेटाला जात होती. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील बंडखोर संघटना बलूच रिपब्लिकन गार्ड्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
बलूच रिपब्लिकन गार्ड्सने (बीआरजी) या हल्ल्यानंतर एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आम्ही शिकारपूर-बीआरजीमध्ये जाफर एक्सप्रेसमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेत आहोत. बलूच रिपब्लिकन गार्ड्सच्या स्वातंत्र्य सैनिकांनी शिकारपूर व जॅकोबाबाददरम्यान सुलतानकोट परिसरात रिमोट-कंट्रोल्ड आयईडी स्फोट करून जाफर एक्सप्रेसला लक्ष्य केलं.”
बलुचिस्तान स्वतंत्र होत नाही तोवर असे हल्ले होत राहणार : बीआरजी
बीआरजीने म्हटलं आहे की “बलुचिस्तानवर अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचे जवान या ट्रेनमधून प्रवास करत असताना आम्ही हा हल्ला घडवून आणला. या स्फोटामुळे अनेक लष्करी जवान ठार झाले आहेत, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत. तसेच ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले आहेत. बीआरजी या हल्ल्याची जबाबदारी घेत आहे. आम्ही यानिमित्त घोषणा करतो की बलुचिस्तान स्वतंत्र होत नाही तोवर अशा मोहिमा चालू राहतील.”
बलुचिस्तानमधील बंडखोरांच्या संघटना सातत्याने जाफर एक्सप्रेसवर हल्ले करत आहेत. २४ सप्टेंबर रोजी मस्तुंग येथील स्पिजेंड परिसरात असाच हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात १० जण जखमी झाले होते. या वर्षाच्या सुरुवातील बलुचिस्तानची राजधानी क्वेटावरून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर बलुच रिपब्लिकन आर्मीने (बीएलए) हल्ला केला होता. त्यावेळी बीएलएच्या माजीद ब्रिगेडने ट्रेनचं अपहरण केलं होतं. तसेच ४०० हून अधिक प्रवाशांना ओलिस ठेवलं होतं.
तब्बल २४ तास बीएलए व पाकिस्तानी लष्करामध्ये चकमक चालू होती. अखेर पाकिस्तानी जवानांनी बीएलएच्या बंडखोरांना ठार करून ओलिसांना मुक्त केलं. तसेच पाकिस्तानी लष्कराचे २० जवान या चकमकीत मारले गेले.