Pakistan violates border ceasefire in jammu kashmir Poonch sector : पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर येथे नियंत्रण रेषेवर (LOC) आज (मंगळवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. जम्मू- काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून विनाकारण गोळीबार करण्यात आल्याची माहिती, अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून पूंछमधील कृष्णा घाटी सेटरमध्ये करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला सडेतोड उत्तर दिले. यावेळी दोन्ही बाजूंनी १५ मिनिटे गोळीबार सुरू होता, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आता गोळीबार थांबला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
७ मे रोजी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान मे महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ९ मे रोजी रात्री उशिरा सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू केला होता.
यावेळी पाकिस्तानी लष्कराने विनाकारण जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. यादिवशी पिर पंजाल भागात ड्रोन देखील पाहायला मिळाले होते. १० मे रोजी झालेल्या घटनेत देखील बीएसएफने पाकिस्तानी लष्कराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
एका निवेदनात बीएसएफच्या जम्मू डिव्हीजनने पुष्टी केली होती की, भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे सीमेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांचे मोठे नुकसान झाले.
“९ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू सेक्टरमधील बीएसएफ चौक्यांवर कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार केला. बीएसएफ योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवरील पाकिस्तानी रेंजर्सच्या चौक्या आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आमचा भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा निर्धार अटळ आहे,” अशी माहिती बीएसएफने एका निवेदनात दिली होती.