Pakistan Will Never Win Any War Against India: भारतासोबत लढून पाकिस्तानला कोणताही फायदा होणार नाही हे पाकिस्तानला समजायला हवे. पाकिस्तान भारताविरोधातील कोणतेही पारंपारिक युद्ध जिंकू शकत नाही, असे वक्तव्य माजी सीआयए अधिकारी जॉन किरियाकौ यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

भारताने गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांविरोधात अनेकदा पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. यामध्ये २०१६ मध्ये नियंत्रण रेषेवरील दहशतवादी लाँचपॅडवर सर्जिकल स्ट्राईक, २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ले आणि या वर्षी मे महिन्यातील ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश आहे.

पाकिस्तान भारताविरोधात कधीच जिंकू शकत नाही

भारत आणि पाकिस्तानमधील सीमा संघर्षाबाबत बोलताना जॉन किरियाकौ म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानमधील प्रत्यक्ष युद्धातून काहीही चांगले होणार नाही. कारण पाकिस्तान भारताविरोधात कधीच जिंकू शकत नाही. मी अण्वस्त्रांबद्दल बोलत नाही, मी फक्त पारंपारिक युद्धाबद्दल बोलत आहे. म्हणून भारताला सतत चिथावण्या देण्याचा कोणताही फायदा पाकिस्तानला होणार नाही.”

ऑपरेशन सिंदूर

एप्रिल महिन्यात पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या केली होती. यानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते.

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते, जे भारतीय लष्कराने परतावून लावले होते. या लष्करी संघर्षादरम्यान भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले होते.

असीम मुनीर यांची चिथावणीखोर वक्तव्ये

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर सातत्याने भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यांनी काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याभोवतीची नस असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतरच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता.

याचबरोबर, असीम मुनीर यांनी जर पाकिस्तानवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान सर्वांना घेऊन बुडेल, असेही म्हटले होते.