Pariksha Pe Charcha 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोबाईलच्या अतिरेकी वापराबाबत भाष्य केले. एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना मोदी म्हणाले, “विद्यार्थ्यांना सर्वात आधी निर्णय करावा लागेल की, तुम्ही स्मार्ट आहात की गॅझेट स्मार्ट आहे. कधी कधी असे वाटते विद्यार्थी स्वतःपेक्षा गॅझेटला स्मार्ट समजतात आणि तिथूनच पुढे चूक होते. तुम्ही जेवढे स्मार्ट असाल तेवढे अधिक गॅझेटला तुम्ही स्मार्टली वापरु शकाल.” यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोबाईलवर रील्स बघणाऱ्यांनाही एक मोलाचा सल्ला दिला आहे. तसेच स्वतः किती मोबाईल वापरतात याची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढलेला स्क्रिनटाईम देशासमोर चिंतेचा विषय

ते म्हणाले, “भारतीय लोक दररोज सरासरी सहा तास मोबाईल स्क्रिनसमोर घालवतात, हा देशासाठी सर्वात चिंतेचा विषय आहे. ज्यांचा हाच व्यवसाय आहे, त्यांच्यासाठी ही चांगली बाब असली तरी इतरांसाठी ते चांगलं नाही. ज्याकाळी मोबाईल फक्त बोलण्यासाठी वापरला जात होता. त्याकाळी मोबाईल स्क्रिनचा दैनंदिन वापर हा केवळ २० मिनिटं एवढाच होता. आता तर रील्स आल्यामुळे वेगळीच अडचण समोर आली आहे. एकदा का रील्समध्ये घुसले की बाहेर येताच येत नाही.”

हे देखील वाचा >> Pariksha Pe Charcha 2023: कॉपीबहाद्दरांना मोदींचा टोला, सूत्रसंचालकाची घेतली शाळा; एकनाथ शिंदेंसह फडणवीसांनाही हसू आवरले नाही

माझा मोबाईलचा वापर माझ्या नियंत्रणात आहे

तुम्ही रील्स बघता का? असा प्रश्न मोदींनी उपस्थित विद्यार्थांना विचारला. त्यावर विद्यार्थी चिडीचूप झाले. जर भारतीय लोक सरासरी सहा तास मोबाईल स्क्रिनवर घालवत असतील तर हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. आपण गॅझेटचे गुलाम बनून जगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला जागृत राहून विचार केला पाहीजे की आपण स्मार्टफोनचे गुलाम तर होत नाही ना? माझ्या हातात तुम्ही कधी मोबाईल पाहिला आहे का? खरंतर मी पण खूप सक्रीय असतो. पण त्याच्यावर किती नियंत्रण ठेवायचे याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे.

आठवड्यातून एकदा डिजिटल फास्टिंग करा

“आपल्या देशात अनेक धर्मांमध्ये उपवास करण्याची परंपरा आहे. आठवड्यातून एखाद दिवशी अन्नत्याग करुन उपवास केला जातो. त्याप्रमाणे आपणही आठवड्यातून एकदा डिजिटल फास्टिंग म्हणजेच मोबाईलपासून दूर राहण्याचा उपवास करा, असा सल्ला मोदींनी दिला. हळूहळू तुम्ही मोबाईलपासून दूर जाल. मी अनेकदा पाहतो की एखादी बैठक चांगली चालेली असते. पण जरा वायब्रेट झालं की लगेच लोक खिशातून मोबाईल काढून त्यात बघत राहतात. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला पाहीजे, पण त्याचा वापर आपल्या पद्धतीने केला पाहीजे.”, असा सल्ला मोदी यांनी दिला.

एकाच घरात राहून मोबाईलवर संवाद

मोबाईलाचा अतिरेकी वापराबाबत मोदी म्हणाले की, आपण पाहतोय एकाच घरात राहून नातेवाईक एकमेकांशी व्हॉट्सअपवर बोलत असतात. आई वडिलांना मेसेज करते. भाऊ बहिणीला मेसेज करतात. एकाच घरात प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये गढून गेलेला असतो. अशाने कुटुंब कसे चालेल? आधी आपण ट्रेनमधून जात असताना गप्पा मारायचो. आता ट्रेनमध्ये नेट मिळालं की, लोकं लगेच सुरु होतात. जसे की संपूर्ण विश्वाचे काम त्यांच्या डोक्यावर पडले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pariksha pe charcha 0 3 pm narendra modi interacts with student eknath shinde devendra fadnavis enjoys speech kvg 85
First published on: 27-01-2023 at 13:03 IST