Amit Shah On Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सध्या संसदेत चर्चा सुरू आहे. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत आहे. या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचंही पाहायला मिळत आहे. ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर आज (२९ जुलै) देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बोलताना पहलगाममधील दहशतवाद्यांबाबत मोठी माहिती दिली आहे. पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा आपल्याकडे पुरावा असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना अमित शाह यांनी सांगितलं की, “श्रीनगरमध्ये करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन महादेव’च्या माध्यमातून तीन दहशतवादी मारले गेले आहेत. हे दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. हे तेच होते ज्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला होता. पहलगाममधील हल्लेखोर पाकिस्तानचे होते, याचे पुरावे आमच्याकडे पुरावे आहेत”, असं अमित शाह यांनी म्हटलं.

“तसेच केंद्र सरकारकडे या संदर्भातील महत्वाचे पुरावे असून दोन दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी मतदार कार्ड होते. तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले चॉकलेट देखील पाकिस्तानात बनलेले होते. मग आणखी कोणते पुरावे हवेत?”, असं अमित शाह यांनी संसदेत बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

अमित शाह पुढे म्हणाले, “ते (काँग्रेस) काल आम्हाला विचारत होते की दहशतवादी कुठून आले? त्यासाठी कोण जबाबदार आहे? अर्थात, आम्ही सत्तेत असल्याने ही आमची जबाबदारी आहे. पण पी चिदंबरम यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय? मी त्यांना विचारू इच्छितो की पाकिस्तानला वाचवून त्यांना काय मिळेल. जेव्हा ते असा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचा अर्थ ते पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेत का?”, असं म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली.

भारताच्या जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून शत्रूला सडेतोड उत्तर दिलं. हाफिज मोहम्मद जमील, मुद्दसर खादियान, याकब मलिक, मोहम्मद हमसाद जमील, मोहम्मद युसूफ, मोहम्मद हसन या दहशतवाद्यांना ठार केलं. पण विरोधक आम्हाला विचारत आहेत की पहलगामचे दोषी कुठे गेले? मी मघाशी जी नावं वाचली त्यातले आठ दहशतवादी असे होते ज्यांनी चिदंबरम गृहमंत्री असताना भारतात हल्ले केले होते आणि आता ते पाकिस्तानात लपून बसले होते. त्यांना आपल्या जवानांनी शोधून ठार केलं आहे. आपल्या जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला या गोष्टीचा विरोधकांना अभिमान नाहीये का?”, असं अमित शाह यांनी म्हटलं.