India US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही काळापासून भारताने रशियन तेलाची आयात बंद करावी, यासाठी दबाव निर्माण करत आहेत. मात्र भारताने या दबावाला बळी न पडण्याची भूमिका घेतली. मात्र रशियाकडून तेल आयात करणाऱ्या यूकेमधील काही देशांना अमेरिकेने सूट दिली आहे. यावरून जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पाश्चिमात्य देशांना सुनावले. पाश्चात्य देश रशियाबरोबर ऊर्जा व्यापार करत असताना भारताला वेगळा न्याय का? असा सवाल गोयल यांनी उपस्थित केला.

वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे बर्लिन गोल्बल डायलॉगमध्ये सहभागी झाले आहेत. या परिषदेत बोलत असताना ते म्हणाले, “मी आजच्या वर्तमान वाचले की, जर्मनीही रशियन तेलाची आयात करत असून त्यांनी अमेरिकेच्या निर्बंधांमधून सूट मागितली आहे. यूकेनेही यावर आधीच तोडगा काढला आहे. कदाचित त्यांनाही सूट मिळाली आहे. मग भारताला वेगळा न्याय का?”

रशियाकडून कच्च्या तेलाची होणारी आयात कमी करण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून भारतावर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पियुष गोयल यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या माहिन्यात भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर एकूण टॅरिफ ५० टक्क्यांवर गेले. भारताने अमेरिकेच्या या निर्णयाचा विरोध केला असून हा कर अयोग्य, अन्याय आणि अवास्तव असल्याचे म्हटले होते.

दबावाखाली व्यापार होणार नाही

भारताच्या स्वतंत्र व्यापार भूमिकेबद्दल बोलताना पियुष गोयल म्हणाले की, भारत घाईघाईत किंवा कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. डोक्यावर बंदूक ठेवून आम्ही व्यापार करार करत नाही. जर आमच्यावर आयातशुल्क (टॅरिफ) लादले तर आम्ही नव्या बाजारपेठेचा शोध घेऊ, स्थानिक मागणीत वाढ करू.

पियुष गोयल पुढे म्हणाले, पुढील २५-३० वर्षात ३० ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीकोनातून भारताची वाटचाल सुरू आहे. आम्ही भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे व्यापार वाटाघाटी करत आहोत. आमच्या देशासाठी उत्तम काय आहे? हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.