पीटीआय, गंगाईकोंडा चोलापुरम (तमिळनाडू)
तमिळनाडूच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले चोल सम्राट राजाराजा चोल आणि त्यांचे पुत्र राजेंद्र चोल प्रथम यांचे भव्य पुतळे उभारले जातील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. राज्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
चोल साम्राज्याची राजधानी असलेल्या गंगाईकोंडा चोलापुरम येथे राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंतीनिमित्त आदि तिरुवतीराई उत्सव साजरा करण्यात आला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून उपस्थिती लावली. चोल सम्राटांचे पुतळे हे भारताच्या ऐतिहासिक जाणीवेचे आधुनिक स्तंभ असतील असे मोदी यांनी घोषणा करताना सांगितले. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशी तमिल संगमम, तिरुक्कुरल या प्राचीन महाकाव्याचे अनुवाद, नवीन संसदभवनामध्ये बसवलेला सेंगोल अशा उपक्रमांमधून तमिळनाडूमध्ये भाजपचा विस्तार करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.
एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास
राजेंद्र चोल यांनी एक हजार वर्षांपूर्वी आपल्या साम्राज्याचा विस्तार उत्तरेला गंगा नदीपर्यंत आणि आग्नेय आशियातील सुमात्रा, मलेशिया आणि म्यानमारपर्यंत केला होता. आपल्या साम्राज्याची खूण म्हणून चोल सम्राटांनी आपली राजधानी तंजावरहून हलवून गंगाईकोंडा चोलापुरम या नव्याने वसवलेल्या नगरामध्ये हलवली होती. तिथेच त्यांनी बृहडेश्वर हे शिवमंदिरही बांधले.
चोलकाळात भारताची आर्थिक आणि लष्करी ताकद एका नव्या उंचीला पोहोचली होती. त्यातून आजही आपल्याला प्रेरणा मिळते. राजाराजा चोल यांनी सामर्थ्यशाली नौदल उभारले, ते राजेंद्र चोल यांनी अधिक मजबूत केले. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
चोलकालीन शिवमंदिरात पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोलकालीन श्री बृहडेश्वर मंदिरात रविवारी पूजा केली. वेदांचे मंत्र आणि शैव तिरुमराईच्या मंत्रांचा जप सुरू असताना मोदी यांनी गंगाजलाचा कलश घेऊन मंदिरात प्रवेश केला आणि पूजा केली. यावेळी त्यांनी पारंपरिक वेष्टी हा तमिळ पोषाख परिधान केला होता. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांचे पूर्ण कुंभम या पारंपरिक सन्मानाने स्वागत केले.