पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यांदरम्यान वारंवार करत असलेल्या काही विधानांमुळे देशाची मान शरमेने खाली जात असल्याचा आरोप शुक्रवारी काँग्रेसकडून करण्यात आला . आमची सत्ता येण्याआधी संपूर्ण जगाला भारताविषयी विश्वासर्हता वाटत नसल्याचे मोदी अनेकदा सांगतात. मात्र, जगाच्या नजरेत आम्ही पुन्हा भारताला विश्वासर्हता मिळवून दिल्याचा मोदींचा दावा आम्ही पूर्णपणे फेटाळून लावत असल्याचे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितले. २०१४ मध्ये मोदी सत्तेत येण्यापूर्वी भारताविषयी विश्वासर्हता नव्हती, असे मोदी परदेश दौऱ्यात अनेकदा सांगतात. भारताविषयीच्या वारंवार अशा उल्लेखामुळे देशाची मान शरमेने खाली जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. जगाच्या नजरेत यापूर्वीही भारताविषयी आदर आणि विश्वासर्हता होती. तत्कालीन सरकारच्या धोरणांमुळे परदेशी गुंतवणुकीसाठी भारत आदर्श ठिकाण होते, असे शर्मा यांनी सांगितले. याउलट सध्या देशात भीतीचे वातावरण आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधानांचीच आहे. मोदी सरकारकडून संरक्षण आणि प्रोत्साहन मिळत असलेल्या काही शक्तींमुळे देशातील वातावरण बिघडत असून गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण म्हणून असणारी भारताची प्रतिमा मलिन होत आहे. या सगळ्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे शर्मा यांनी म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi is embarrassing india says congress