Narendra Modi Praises Donald Trups Role In Gaza Peace: हमासने इस्रायली ओलिसांना सोडण्याची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता कराराचे काही मुद्दे स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गाझा शांतता करारातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
“गाझामधील शांतता प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत आहे. यामधील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे आम्ही स्वागत करतो. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारत न्याय्य शांततेच्या दिशेने होणाऱ्या सर्व प्रयत्नांना कायम पाठिंबा देत राहील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
हमासने सर्व इस्रायली ओलिसांना व ज्या ओलिसांचा मृत्यू झाला आहे त्यांचे मृतदेह सोडण्यास आणि गाझातील युद्ध संपविण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. गाझाचे प्रशासन पॅलेस्टिनी टेक्नोक्रेट्स या स्वतंत्र संस्थेकडे सोपविण्यासही हमासने सहमती दर्शविली. हमासने सत्ता सोपविण्याची आणि ओलिसांना सोडण्याची तयारी दर्शविली, परंतु डोनाल्ड ट्रम्पच्या प्रस्तावाच्या अनेक मुद्द्यांवर अजूनही वाटाघाटी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
बॉम्बहल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला गाझावरील बॉम्बहल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी लिहिले की, “इस्रायलने गाझावरील बॉम्बहल्ले तात्काळ थांबवावा जेणेकरून आपण ओलिसांना सुरक्षितपणे आणि लवकर बाहेर काढू शकू. सध्या असे करणे खूप धोकादायक आहे. आपण विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहोत. हा प्रश्न फक्त केवळ गाझाबद्दल नाही, तर मध्य पूर्वेतील दीर्घकाळापासून अपेक्षित शांततेबद्दल आहे.”
दुर्दैवाने, काही ओलिस…
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले. ते म्हणाले, “हे घडवून आणण्यासाठी मला मदत करणाऱ्या सर्व देशांचे मी आभार मानू इच्छितो. इतक्या लोकांनी कठोर संघर्ष केला. हा एक मोठा दिवस आहे. काय होते ते पाहूया. आपल्याला अंतिम निर्णय घ्यावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी ओलिस त्यांच्या कुटुंबियांकडे परतण्याची वाट पाहत आहे. दुर्दैवाने, काही ओलिस, ते कोणत्या परिस्थितीत आहेत हे तुम्हाला माहिती आहे.”
