PM Narendra Modi on Semiconductor Development: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. १०३ मिनिटे केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. २०२५ च्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी देशातील तरुणांना सोशल मीडियासारखे स्वदेशी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे आवाहनही केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, भारतात सेमीकंडक्टर कारखाना सुरू करण्याचा विचार ५०-६० वर्षांपूर्वी सुरू झाला होता. पण आमच्या सरकारने मिशन मोडमध्ये सेमीकंडक्टर उद्योगावर काम सुरू केले. तोपर्यंत ही योजना आजवर रखडलेली होती. सध्या सहा चिप प्लँट यांची उभारणी प्रगतीपथावर आहे. तर आणकी चार प्लँट्सना हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“२१ वे शतक तंत्रज्ञानावर चालणारे आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. तंत्रज्ञानात उत्कृष्ट कामगिरी करणारे देश विकासाच्या शिखरावर पोहोचले आहेत. त्यांची आर्थिक शक्ती नव्या उंचीवर पोहोचली आहे. आज लाल किल्ल्यावरून मी भूतकाळातील सरकारवर टीका करणार नाही. परंतु देशातील तरुण पिढीला हे माहीत असायला हवे की, ५०-६० वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर कारखाना सुरू झाला होता, त्यासाठी फायलीही सरकवल्या गेल्या. पण सेमीकंडक्टरचा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. आपण पाच ते सहा दशके वाया घालवली. आज ज्या देशांनी सेमीकंडक्टरमध्ये तज्ज्ञता मिळवली आहे, ते जागतिक स्तरावर त्यांची ताकद दाखवत आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.

पतंप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आम्ही स्वतःला भूतकाळातील ओझ्यातून मुक्त केले आहे आणि सेमी कंडक्टर प्लँटवर मिशन मोडवर काम केले. लवकरच सहा युनिट्स सुरू होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतातील लोकांनी बनवलेल्या चिप्स बाजारात उपलब्ध होतील.”

या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत चार नवीन सेमीकंडक्टर उत्पादन आणि चाचणी संयंत्रांना मंजुरी दिली. याचा एकूण आर्थिक खर्च ४,५९४ कोटी रुपये आहे. यापैकी दोन प्लँट ओडिशामध्ये आणि प्रत्येकी एक पंजाब आणि आंध्र प्रदेशात उभारले जाणार आहेत. यासह सरकार आता फॅब्रिकेशन प्लँटपासून ते असेंब्ली आणि चाचणी ऑपरेशन्सपर्यंत एकूण १० चिप संबंधित कारखाने बांधण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे.

काँग्रेसकडून टीका

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सेमीकंटक्टरच्या दाव्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान खोटे बोलत आहेत. चंदीगडमध्ये सेमीकंडक्टर्स कॉम्प्लेक्स लिमिटेडचे काम १९८३ साली सुरू झाले होते. भारताने सेमीकंडक्टर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ५० ते ६० वर्ष लावली, हा दावा साफ खोटा आहे.

स्वदेशी सोशल मीडियासाठी प्रोत्साहन

स्वदेशी सोशल मीडिया आणि टेक प्लॅटफॉर्मसाठी तरूणांना पुढे येण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. ते म्हणाले, सर्जनशील जग असो किंवा सोशल मीडिया, मी देशातील सर्व तरुणांना आपले स्वतःचे व्यासपीठ विकसित करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करत करतो. आपण इतरांवर अवलंबून का राहावे? भारताची संपत्ती परदेशात का जाऊ द्यावी? असे पंतप्रधान मोदी म्हणाले.