नवी दिल्ली : युक्रेनमधील संघर्ष संपविण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडे व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अलास्का येथील शिखर बैठकीत झालेल्या चर्चेबाबत पुतिन यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की ट्रम्प यांच्याशी चर्चेसाठी अमेरिकेच्या राजधानीत दाखल झाले असताना पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनी केला.

युद्धसमाप्तीसाठी होणाऱ्या कोणत्याही शांततापूर्ण प्रयत्नांना भारताचा पहिल्यापासून पाठिंबा असल्याचे पंतप्रधानांनी पुतिन यांना सांगितले. या दूरध्वनी संभाषणानंतर मोदी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर माहिती दिली. “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे दूरध्वनी केल्याबद्दल आभार… ट्रम्प यांच्याबरोबर अलीकडेच अलास्कामध्ये झालेल्या चर्चेबाबत त्यांनी माहिती दिली.

भारताने कायमच युक्रेन संघर्ष चर्चेच्या माध्यमातून संपविण्यास पाठिंबा दिला आहे. येत्या काही दिवसांत त्या दिशेने चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे,” असे पंतप्रधानांनी लिहिले आहे. या संभाषणात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.