आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. यापूर्वीही त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी देशवासीयांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांशी संवाद साधणार असून त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी देशवासीयांसोबत बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये,” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्या होत्या. करोना नावाच्या संकटाने जगाला ग्रासलं आहे. जगातल्या सगळ्या मानवजातीला करोनाचा त्रास होतो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही जगातल्या सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता जेवढा करोनामुळे होतो आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता आज ते काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.