लडाख : हिंसाचारग्रस्त लेह शहरामध्ये सोमवारी सहाव्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली. त्यातच ‘जोपर्यंत लडाखमध्ये जनजीवन सुरळीत होणार नाही, तोपर्यंत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेत सहभागी होणार नाही,’ अशी भूमिका लेह शिखर संघटनेने (एलएबी) जाहीर केली.
लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या आंदोलनानंतर लेहमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर ८० पोलिसांसह दीडशे नागरिक जखमी झाले होते. लेह शिखर संघटनेचे अध्यक्ष तुपस्तान छेवांग यांनी या भागातील नागरिकांमध्ये असलेली भीती, नैराश्य आणि असंतोष दूर करण्यासाठी गृहमंत्रालय आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.
दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्या ‘कारगिल लोकशाही आघाडी’नेही (केडीए) पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह अटकेत असलेल्या अन्य कार्यकर्त्यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी केली. तसेच स्वतंत्र राज्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही स्पष्ट केले. तत्पूर्वी लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सोमवारी या प्रांतातील परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली.
लडाखमध्ये सध्याची परिस्थिती लक्षात घेता, जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही आणि अनुकूल वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही चर्चेत भाग घेणार नाही. – तुपस्तान छेवांग, अध्यक्ष, लेह शिखर संघटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या ‘डीएनए’मध्ये लोकशाही रुजली आहे. मग लडाखवासीयांनी लोकशाहीची मागणी केली तर काय चुकीचे केले? सुरक्षा दलांचे कृत्य बेजाबदारपणाचेच म्हणता येईल. म्हणूनच आम्हाला लोकशाही हवी आहे. – सज्जाद कारगिली, कारगिल लोकशाही आघाडीचे नेते
कारगिल युद्धातील वीर जवानाच्या मृत्यूचा निषेध
कारगिल युद्धात शौर्य गाजवणारे भारतीय जवान त्सेवांग थारचिन यांचाही लेहमधील हिंसाचारात मृत्यू झाला. त्यांच्यावर स्कुरबुचान येथे होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षा व्यवस्थेचा नायब राज्यपाल गुप्ता यांनी आढावा घेतला. थारचिन यांच्या मृत्यूबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दु:ख व्यक्त केले. शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करणाऱ्या थारचिन यांच्यावर गोळीबार करणाऱ्या सुरक्षा दलाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
इंटरनेट सेवा खंडित; पर्यटन क्षेत्राला फटका
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लेहमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. या परिस्थितीचा फटका लडाखमधील पर्यटन क्षेत्रालाही बसला असून अनेक पर्यटकांनी हॉटेल बुकिंग रद्द केले, तर हॉटेलमध्ये थांबलेल्या अनेक पर्यटकांनी बाहेर फिरण्याऐवजी खोलीतच थांबणे पसंत केले आहे.