भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानातल्या मोठ्या राजकीय घडामोडी या भारतावर परिणाम करणाऱ्या ठरत असतात. इम्रान खान यांच्या धोरणांचा, विशेषत: भारतविषयक धोरणांचा देखील दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे भारतावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. इम्रान खान सरकार कोसळण्याच्या बेतात असून प्रमुख मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान लवकरच राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३ एप्रिलला इम्रान खान यांची परीक्षा!

येत्या ३ एप्रिल रोजी इम्रान खान यांच्यावरील अविश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. मात्र, त्याआधीच महत्त्वाच्या मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे इम्रान खान सरकार अडचणीत सापडलं आहे. पाकिस्तानमधील मुत्तेहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान (एमक्यूएम-पी)नं सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे सरकार पडण्याच्या बेतात आलं आहे. बलुचिस्तानमधील आवामी पार्टीनं देखील इम्रान खान सरकारचा पाठिंबा काढला आहे.

आकडेवारी काय सांगते?

पाकिस्तानच्या संसदेमध्ये एकूण ३४२ सदस्य आहेत. त्यापैकी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला बहुमतासाठी किमान १७२ जागांची आवश्यकता आहे. सध्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे १५५ सदस्य असले तरी २४ जणांनी बंडखोरी केली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज गट आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांनी इम्रान खान यांच्या सरकारविरोधात ८ मार्च रोजी अविश्वास ठराव मांडला आहे. पाकिस्तानमधील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी इम्रान खान यांचंच सरकार जबाबदार असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.

बैठकांना वेग!

दरम्यान, एकीकडे सरकार अल्पमतात आलं असताना सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आज रात्री इम्रान खान देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. मात्र, त्याआधीच इम्रान खान यांनी लष्कर प्रमुख कमार जावेद बाजवा आणि आयएसआयचे प्रमुख नदीम अंजुम यांची भेट घेतली.

हेही वाचा : विश्लेषण : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची राजकीय कोंडी कशामुळे? देशात पुन्हा अस्थैर्य येणार का?

या बैठकीनंतर इम्रान खान यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये देशात निर्माण झालेली परिस्थिती आणि अविश्वास ठराव यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political crisis in pakistan prime minister imran khan to step down pmw