रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नसून या युद्धाला तीन आठवडे उलटून गेले आहेत. रशियन फौजांकडून युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. तर दुसरीकडे रशियाने अजूनही आपले हल्ले कमी केले नसून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने मारियोपोल या शहरातील एका थिएटरवर शक्तीशाली बॉम्ब टाकला आहे. या बॉम्बहल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून थिएटरमध्ये सुमारे १००० ते १२०० लोकांनी आश्रय घेतलेला होता.
रशियन सैनिकांनी बुधवारी मारियोपोल शहरातील एका थिएटरवर शक्तिशाली बॉम्ब टाकला, अशी माहिती युकेनियन परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तसेच मारियोपोलचे उपमहापौर सर्गेई ऑर्लोव्ह यांनी बॉम्बहल्ला झालेल्या थिएटरमध्ये १००० ते १२०० लोकांनी आश्रय घेतल्याचा दावा केलाय. दुसरीकडे युक्रेनच्या या दाव्याचे रशियाने खंडन केले आहे. रशियन सैनिकांनी थिएटरवर हल्ला केलेला नाही. तर या हल्ल्यामागे युक्रेनमधीलच अझोव्ह बटालीयन या अतिउजव्या संघटनेचा हात आहे, असा असं रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
‼️This is all that remains of the Drama Theater in #Mariupol
According to local media, up to 1,000 people could have been inside the building. All of them are now under the rubble of the building. The exact number of casualties is still unknown. pic.twitter.com/4L3D8lt39E— NEXTA (@nexta_tv) March 16, 2022
युरोपीयन माध्यम NEXTA TV ने युक्रेनमधील स्थानिक माध्यमांचा हवाला देत थिएटरमध्ये आश्रय घेतलेले सर्व लोक आता मातीच्या ढिगाऱ्याखाली आहेत, असं म्हटलंय. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,१४३ जण जखमी झाले आहेत. तसेच युक्रेनमधून सुमारे ३० लाख नागरिकांनी स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने दिलेली आहे. असे असताना आता युक्रेमधील थिएटरवर झालेला हा बॉम्बहल्ला चिंतेचा विषय ठरतोय.
दरम्यान, रशियाने आपली आक्रमक भूमिका न बदलल्यामुळे अमेरिकेनेही युक्रेनची मदत करण्याचे जाहीर केले आहे. अमेरिका युक्रेनला आर्थिक तसेच लष्करी मदत देणार आहे. युक्रेनसाठी आम्ही ८०० मिलियन अमेरिकन डॉलर्सची संरक्षण विषयक आर्थिक मदत देणार आहोत, असं बायडेन यांनी जाहीर केलंय. तसेच अमेरिकेकडून युक्रेनला ८०० अॅण्टी-एअरक्राफ्ट सिस्टीम्स, ९ हजार अॅण्टी-आर्मोर (मिसाइल) सिस्टीम्स, ७ हजार छोट्या आकाराची शस्त्रं ज्यामध्ये लहान बंदुकी आणि ग्रेनेड लॉन्चर्स देण्यात येणार आहेत.