काही माथेफिरूंकडून अंदाधुंद गोळीबार होऊन त्यात निरपराध नागरिकांचा बळी जाण्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. त्यातल्या बहुतांश घटना अमेरिकेत घडल्याचं दिसून आलं. मात्र, अतिशय संपन्न असा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या प्रागमध्ये अशा प्रकारचा अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एका विद्यार्थ्याने तो शिकत असलेल्या विद्यापीठातच हा गोळीबार केला असून या सगळ्या धुमश्चक्रीत त्याचाही मृत्यू झाला आहे. त्यानं आत्महत्या केली की पोलिसांच्याच गोळीबारात तो ठार झाला, याचा तपास पोलीस करत असल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गुरुवारी झेक प्रजासत्ताकमधील प्रतिष्ठित प्राग विद्यापीठात घडली. २४ वर्षीय हल्लेखोर तरुणानं आधी त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तो प्राग विद्यापीठात शिरला आणि मुख्य इमारतीत त्यानं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात इमारतीतील १३ जणांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांशी झालेल्या धुमश्चक्रीमध्ये स्वत: हल्लेखोरही ठार झाला आहे. या घटनेनंतर झेक प्रजासत्ताक सरकारनं २३ डिसेंबर रोजी एक दिवसाचा शोक जाहीर केला आहे.

पोलिसांना आधी माहिती मिळाली होती, पण…

घटनेनंतर पोलिसांना प्राग विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या खालच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर गोळ्या सापडल्या. हल्लेखोर तरुण क्लाडगो भागातील त्याच्या घरातून निघाला असून तो आत्महत्या करू शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्याच्या शोधात निघालेही. मात्र, काही मिनिटांतच या तरुणाच्या वडिलांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने प्राग विद्यापीठात धाव घेत तेथील कला विभागाची इमारत रिकामी केली. हल्लेखोर तिथे एक लेक्चर ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पण पोलिसांचा अंदाज चुकला. हल्लेखोर तरुण थेट विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये शिरला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने मुख्य इमारतीच्या दिशेनं धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर तरुणानं गोळीबार करून १३ जणांचे प्राण घेतले होते.

तरुणाला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही!

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण त्याच्या महाविद्यालयातील अभ्यासात अत्यंत हुशार होता. तसेच, त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे या तरुणानं असं कृत्य का केलं? याचा तपास पोलीस आता घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prague university firing gunman killed 14 people latest news pmw